जाऊबाई जोरात! कतरिना पाठोपाठ आता येणार कतरिनाची जाऊ…आहे मंत्र्याची नात

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी खासगी समारंभात आपला लग्नसोहळा उरकत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. या सोहळ्याचे काही फोटो कतरिनाने आपल्या सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः या फोटोमधील एक चेहरा आता लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. कोण आहे बरं हा चेहरा?

हा चेहरा आहे शर्वरी वाघचा. शर्वरी वाघ एक अभिनेत्री आहे. ऍमेझॉन प्राईमच्या २०२० च्या ‘द फरगॉटन आर्मी- आझादी के लिए’ या वेब सिरीज मध्ये काम करत तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. याच वर्षी तिचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या आधी तिने काही चित्रपटांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे. प्यार का पंचनामा २ (२०१५), बाजीराव मस्तानी (२०१५), सोनू के टिटू की स्वीटी (२०१८) अशा काही बॉलिवूड चित्रपटांसाठी तिने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. यासाठी ती गेली तीन वर्षे आदित्य चोप्राला आपला मेंटॉर बनवून त्याच्या हाताखाली काम करत आहे.

शर्वरीला कतरिनाच्या लग्नाच्या फोटोंमध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. शर्वरी कदाचित लवकरच कतरिनाची जाऊबाई बनू शकते. कारण ती सध्या विकी कौशलच्या लहान भावाला म्हणजेच सनी कौशलला डेट करत आहे. त्यामुळे तिला कतरिना आणि विकीच्या लग्नाचं विशेष आमंत्रण होतं. या फोटोंमध्ये ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

शर्वरीचा जन्म १४ जून १९९६ चा आहे. ती एका मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. तिचे वडील शैलेश वाघ एक बिल्डर आहेत, तर आई नम्रता वाघ एक आर्किटेक्ट आहे. तिची बहीण कस्तुरी देखील एक आर्किटेक्ट आहे. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. मनोहर जोशी हे शर्वरीच्या आईचे वडील आहेत. शर्वरीने आपले शिक्षण मुंबईच्या ‘द दादर पारसी युथस् असेम्ब्ली हायस्कूल’ मधून पूर्ण केले, तर कॉलेजचे शिक्षण तिने रुपारेल कॉलेज मधून पूर्ण केले.

आता लवकरच सनी आणि शर्वरीचे लग्न देखील पाहायला मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. आता हे दोघेही विकी आणि कतरिना सारखे खासगी समारंभात लग्न करणार की सगळ्यांना सांगून सावरून लग्न करणार, हे तर येणारा काळच सांगू शकतो.