‘तारक मेहता का…’ मधील गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या नावाची कहाणी! जाणून घ्या खरी गोष्ट…

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका एक अनोखी मालिका आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचे हे जवळपास १३ वे वर्ष आहे. तरीही या मालिकेची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहेत. इतकेच काय, तर मालिकेतील वस्तू देखील प्रेक्षकांच्या ओळखीच्या झाल्या आहेत.

गोकुलधाम सोसायटी, अब्दुलचे सोडा शॉप आणि गडा इलेक्ट्रॉनिक्स ही मालिकेतील तीन मुख्य ठिकाणे आहेत. मालिकेतील बऱ्याच गोष्टी या तीन ठिकाणी घडताना दिसतात. यातील बराच सेट असला तरी गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान मात्र खरेच अस्तित्वात आहे. मुंबईच्या खार भागात हे दुकान आपल्याला पाहायला मिळते. या दुकानाच्या नावामागे एक अत्यंत रंजक कहाणी आहे.

गडा इलेक्ट्रॉनिक्स या खऱ्या दुकानाचे खरे मालक आहेत शेखर गडियार. त्यामुळे या दुकानाचे पहिले नाव ‘शेखर इलेक्ट्रॉनिक्स’ असे होते. मात्र जशी जशी मालिकेची लोकप्रियता वाढत गेली तसे मग दुकानाच्या मूळ मालकांनी दुकानाचे नाव बदलून ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ असे ठेवले. शेखर गडियार यांच्या एका मित्राने त्यांना फार पूर्वी दुकान शूटींग साठी भाड्याने मागितले होते. मात्र शेखर यांनी त्यासाठी ‘दुकान एक दिवस पण बंद ठेवू शकत नाही’ असे सांगत साफ नकार दिला होता.

नंतर ‘तारक मेहता का…’ मालिकेसाठी दुकान भाड्यावर देताना ते थोडे काळजीत होते. दुकानात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्याने त्यांना धक्का लागून त्यांचे नुकसान होईल असे त्यांना वाटत होते. मात्र गेल्या १३ वर्षांमध्ये दुकानातील एकाही गोष्टीला किंचितसुद्धा धक्का लागला नसल्याचे शेखर गडियार सांगतात. दुकानात गिऱ्हाईकांपेक्षा आता पर्यटकच जास्त येतात, असेही ते सांगतात.

दुकानात वेगवेगळ्या ठिकाणांहून पर्यटक येतात. ते दुकानात आणि दुकानासमोर फोटो काढतात. कधी कधी तर ते खरंच गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहेत हे पटवून देण्यासाठी व्हिडिओ कॉल देखील करतात. खरंतर हे पर्यटक त्यांच्या आवडत्या मालिकेतील दुकान पाहायला आलेले असतात. त्यामुळे ते या दुकानातून कधीच कोणती वस्तू विकत घेत नाहीत. पण दुकानासह फोटो काढतात. त्यामुळे आपसूकच या दुकानाचे नाव सर्वत्र झाले आहे.

मालिकेत या गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये देखील अनेक गमती घडताना दिसतात. मालिकेतील दुकानाचे मालक जेठालाल गडा, नटू काका, बागा यांचे अनेक किस्से या दुकानाने पाहिले आहेत. मंडळी, तुमचा या गडा इलेक्ट्रॉनिक्स मधला आवडता किस्सा कोणता आहे, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.