लतादीदींच्या चाहत्याची अनोखी भेट! तब्येतीसाठी केवळ प्रार्थना नाही, तर दिली…

तब्येत बिघडल्यामुळे गेले १०-१२ दिवस भारताच्या गानकोकिळा म्हणून लौकिक मिळवलेल्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातील तमाम जनता या बातमीने काळजीत पडली आहे. सध्या जरी लतादीदी गात नसल्या तरी त्यांनी आजपर्यंत गायलेली अनेक गाणी अजरामर झालेली आहेत. लतादीदींच्या आवाजाचे आजही लोक कौतुक करतात. तसेच त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही कायम आहे. लतादीदींची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने आयसीयू कक्षात दाखल करण्यात आले आहे. अजूनही त्या आयसीयू मध्येच असल्याची बातमी आहे. अर्थातच या बातमीने त्यांच्या चाहत्यांच्या काळजीत भरच पडली आहे.

अनेकदा आपण पाहतो, की आपल्या आवडत्या कलाकाराच्या तब्येतीसाठी लोक नेहमीच देवाकडे प्रार्थना करताना दिसतात. कधी ते मंदिरातल्या देवाला साकडं घालतात, तर कधी दर्ग्याच्या पीर बाबांकडे विनवणी करतात. कधी नवस बोलतात, तर कधी चक्क देवच पाण्यात ठेवतात. एकूणच काय, तर त्या कलाकाराचे सगळेच चाहते आपापल्या परीने तो कलाकार बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत असतात. लतादीदींच्या चाहत्यांची गोष्टही काही वेगळी नाहीये.

मात्र लतादीदींच्या एका चाहत्याने मात्र एक वेगळीच गोष्ट केली आहे. लतादीदींचा हा चाहता केवळ देवाकडे प्रार्थना करून थांबला नाही, तर त्याने आपल्या परीने लतादीदींना बरे होण्यासाठी मदत देखील केली आहे. सत्यवान गीते असे या चाहत्याचे नाव आहे. सत्यवान गीते मुंबईत राहतात. ते एक रिक्षाचालक आहेत. ‘इंडिया टुडे’ च्या रिपोर्टनुसार, सत्यवान लतादीदींचे इतके मोठे चाहते आहेत, की ते लतादीदींना चक्क देवी सरस्वतीचे रूप मानतात. त्यांनी आपली रिक्षा लतादीदींच्या फोटोंनी सजवली आहे. लतादीदींच्या गाण्यांमधील काही ओळी देखील त्यांनी आपल्या रिक्षावर लिहिलेल्या पाहायला मिळतात.

लतादीदींवर तब्येत बरी नसल्या कारणाने मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशावेळी केवळ प्रार्थना न करता सत्यवान गीते यांनी आपली आयुष्यभराची कमाई लतादीदींच्या उपचारासाठी म्हणून दान केली आहे. यामागे त्यांचा केवळ लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, असा निर्मळ हेतू आहे. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना त्यांनी आपल्या रिक्षावर देखील लिहिली आहे. लतादीदींच्या या चाहत्याने आपल्या आयुष्यभराची पुंजी लतादीदींसाठी दान करत एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनासोबतच त्यांना आता न्यूमोनियाही झाला आहे. उपचारांना त्या थोडा थोडा प्रतिसाद देऊ लागल्या आहेत, मात्र यामध्ये म्हणावी तितकी प्रगती नाही.