‘आई कुठे काय करते!’ मधील या अभिनेत्याने मालिका सोडली? समोर आले हे कारण…

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते!’ ही मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आहे. अरुंधतीने घर गहाण ठेवल्याने देशमुखांच्या घरात बराच गदारोळ माजलेला दिसून आला. मात्र यशच्या कामाचे पैसे आणि केदारने काढलेले कर्ज, तसेच अरुंधतीला तिच्या कामाची मिळालेली ऍडव्हान्स रक्कम असे सगळे पैसे एकत्र करून अखेरीस अरुंधतीने आपले घर सोडवले आहे. केदारची अरुंधतीला नेहमीच मदत मिळत आलेली आहे. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता केदारने केलेल्या मदतीचे उपकार राहतील, असे अरुंधतीला वाटत राहते.

सध्या या मालिकेतील एका कलाकाराने मालिका सोडल्याची बातमी येत आहे. केदारची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष कुलकर्णीने ‘आई कुठे काय करते!’ ही मालिका सोडली असल्याची बातमी येत आहे. केदारच्या भूमिकेने आशिषला घरोघरी पोहोचवले आहे. देशमुख कुटुंबाचा जावई असला तरी आई-आप्पांसाठी अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे असलेला केदार प्रेक्षकांना खूप आवडतो. मात्र आता आशिषच्या मालिका सोडण्याच्या बातमीमुळे प्रेक्षक थोडे चिंतेत आहेत.

आशिष कुलकर्णी सोनी मराठी वाहिनी वरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचे कळते. या मालिकेत काम करण्यासाठीच आशिष ‘आई कुठे काय करते!’ मालिका सोडत असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या बातमीला अजून आशिष कुलकर्णीने कोणतीही पुष्टी दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या संभ्रमातून बाहेर पडण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे या मालिकेचे आगामी भाग न चुकता पाहणे. ‘आई कुठे काय करते!’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये कळेलच, की केदार अर्थात आशिष कुलकर्णीने मालिका सोडली आहे की ती केवळ एक अफवा आहे.

दरम्यान ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झालेली पाहायला मिळाली. अरुंधतीचा कॉलेजमधला क्लासमेट आशुतोष अरुंधतीला आश्रमाच्या कार्यक्रमात भेटतो. तिचं गाणं ऐकून तो तिला त्याच्या अल्बम मध्ये गाण्याची संधी देतो. यशलाही आशुतोष आपल्या नव्या अल्बम साठी गाणं कम्पोज करायची संधी देतो. अरुंधती आणि आशुतोषने एकत्र येणं अनिरुद्ध, कांचन आणि अभीला पटत नाही. त्यावरून ते सारखेच अरुंधतीला बोलताना दिसत आहेत.

यश मात्र नेहमीप्रमाणे आपल्या आईला पाठींबा देताना दिसून येत आहे. मालिकेत अजून कोणकोणती वळणं येणार, हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. तोपर्यंत आशिषचे चाहते त्याच्या बातमीची वाट पहात आहेत.