आमिर खान चढणार पुन्हा बोहल्यावर! कोण असेल तिसरी पत्नी? पहा..

मराठी इंडस्ट्री मधील अनेक कलाकार यंदा कर्तव्य आहे म्हणत असताना सध्या बॉलिवूडमधील कलाकारांनाही लगीनघाई झाल्याचे दृश्य आहे. नुकताच अभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांचा लग्नसोहळा थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. पुढील महिन्यात अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या डोक्यावर अक्षता पडणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर देखील आपल्या लग्नाच्या तयारीला लागले असल्याचे कळते.

अशावेळी परफेक्शनिस्ट आमिर खान मागे राहीलच कसा! आमिर खानच्या लग्नाची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. हो हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. आमिर खान नेहमीच त्याच्या लग्नांमुळे चर्चेत राहिला आहे. नुकताच त्याचा आणि किरण रावचा घटस्फोट झाला होता. या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. वेगळे झाल्यानंतर दोघांनीही आमचे पती-पत्नी म्हणून वेगळे झालो असलो तरी सह-पालक आणि एकमेकांच्या कुटुंबासारखेच असणार आहोत, असे जाहीर केले होते. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे.

१९८६ मध्ये आमिरने रीना दत्ता बरोबर लग्न केले होते. मात्र २००२ मध्ये दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. पुढे २००५ मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केले. दोघांची भेट ‘लगान’ (२००१) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. दोघांचा संसार सुखात सुरू होता. त्यामुळे त्यांनी अचानक वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही.

आमिर आणि किरण वेगळे झाल्यानंतर त्यावर बरंच ट्रोलिंग देखील करण्यात आलं होतं. ‘रीना झाली, किरण झाली, आता तिसरं लग्न कुणाबरोबर?’ असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सारखा विचारला जात होता. आमिरची ‘दंगल’ चित्रपटातील सहकलाकार फातिमा सना शेख हीच त्याची तिसरी पत्नी असेल, असे म्हणत तिला देखील बरेच ट्रोल केले गेले. मात्र या सगळ्या अफवा असल्याचे नंतर समोर आले.

आता देखील आमिर खान पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आमिर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिल मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर लगेच त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करेल असे बोलले जात आहे. मात्र त्याची तिसरी वधू कोण असणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. ती त्याची सहकलाकार असेल असे बोलले जात आहे. मात्र आमिर खानने यातील कोणत्याही बातमीची पुष्टी केलेली नाही.