गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं होत हे खास नातं, जाणून घ्या त्यांच्या गोड नात्याचे गुपित..

संगीतविश्वावर आता शोककळा पसरली आहे.. ती लता दीदींच्या निधनाने… वयाच्या ९२व्या वर्षी लता दीदींनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सारा भारत देश हळहळ व्यक्त करतो आहे. त्यापैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर…

लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकर यांच्यामध्ये एक गोड आणि खास नातं होतं. सचिन नेहमी लता दिदींना मातृतुल्य मानत असे. जितका प्रेमळ भाव लता दीदींचा होता तितकाच आदर सचिन त्यांचा करत होता. सचिन आणि लता दीदी यांच्या नात्याबद्दल बोलताना त्या म्हणत, सचिन मला आई मानतो हे माझे भाग्यच आहे. त्याच्यासारखा मुलगा मिळणे खरंच एखादा पुरस्कार मिळाल्याप्रमाणे आहे. मीही त्यांच्यासाठी आईप्रमाणे प्रार्थना करते. त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा आई म्हटले होते तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे कारण ते असं काही बोलतील याची कल्पना मला नव्हती. ते मला आई मानतात याचा मला खूप आनंद आहे.”

लता दीदींनी नेहमी सचिनचे भरभरून कौतुक केले. जेव्हा सचिनला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले त्या आधी बऱ्याच वेळा लता दीदींनी त्याच्या नावाची शिफारस भारतरत्न पुरस्कारासाठी केली होती. त्या म्हणत, “माझ्यासाठी सचिन तेंडुलकर हेच खरे भारतरत्न आहेत. त्यांनी देशासाठी जे केले ते फार कमी लोक करू शकतात. ते या सन्मानास पात्र आहेत. त्यांनी आपल्या सर्वांना अभिमान मिळवून दिला आहे.”

साल २०१७ मध्ये सचिनचा जीवनपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा दीदींनी सचिनला “सचिनजी नमस्कार. तुमचा जो चित्रपट येत आहे त्यामध्येही तुम्ही क्रिकेटच्या मैदानासारखे चौकार आणि षटकार मारून धूमाकुळ घालणार, यासाठी शुभेच्छा’. असे ट्विट करून ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. याला उत्तर देत सचिनने आईच्या आशिर्वादाशिवाय चौकार आणि षटकार कधीच होत नाहीत. तुम्ही माझ्यासाठी मातृतुल्य आहात. तुमच्या आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद’. असे ट्विट केले होते.

यासोबतच लता दीदींसाठी हे नाते जास्त खास होते कारण, सचिनचा वाढदिवस २४ एप्रिल ला असतो. हे आपल्याला माहीतच आहे. पण या दिवसामुळे त्यांचे नाते आणखी खास होते. कारण ज्या दिवशी सचिनचा वाढदिवस असतो त्याच दिवशी लता दीदींच्या वडिलांची पुण्यतिथी असते. याबद्दल खुद्द लता दीदींनी म्हटले होते की, “ज्या दिवशी माझ्या वडिलांची पुण्यतिथी असते तेव्हाच सचिनचा वाढदिवस असतो.”