अभिनेत्री काजोल देवगण करते लाडक्या सासूबाईंवर खूप प्रेम, हा किस्सा ऐकून तुम्हीपण व्हाल थक्क…घडले असे काही

अभिनेत्री काजोलने नव्वदचे दशक गाजवले होते. आताही तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू टिकून आहे. काजोलने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजोल आणि अजय देवगणची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली होती. पुढे काजोल आणि अजय देवगणचे लग्न झाल्यावर प्रेक्षकांना खूपच आनंद झाला होता. २४ फेब्रुवारी १९९९ रोजी या दोघांचे लग्न झाले.

काही लोकांना पहिल्यापासूनच काजोल थोडी आगाऊ वाटत आली आहे. काजोल स्वतःसुद्धा हे मान्य करते. ती परखड बोलणारी आणि मूडी स्वभावाची असल्याचं देखील ती मान्य करते. तिच्या या स्वभावामुळे तिचे तिच्या सासूबरोबर नेहमीच खटके उडायचे. तिने स्वतःच या गोष्टीची कबुली दिली होती. सासू-सुनेमध्ये भांडण होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र काजोल आणि तिच्या सासूच्या बाबतीत असे काही घडले, की काजोल चक्क आपल्या सासूबाईंच्या प्रेमातच पडली.

अभिनेत्री ट्विन्कल खन्नाच्या ट्विक इंडिया चॅट शो (Tweak India Chat Show) मध्ये काजोलने एक किस्सा सांगितला होता. या घटनेनंतर काजोल आणि तिच्या सासूमध्ये एक सामंजस्याचे आणि प्रेमाचे नाते निर्माण झाले.

काजोलने सांगितले, की लग्नाआधी ती अजयच्या आईला ‘आंटीजी’ अशी हाक मारायची. लग्नानंतरही ती त्यांना त्याच नावाने बोलवायची. त्यांना इतक्यात ‘आई’ म्हणून हाक मारावीशी वाटत नव्हती. एकदा काजोलच्या सासूबाईंच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. त्यावेळी काजोलला स्वतःच्या सासूला ‘आंटीजी’ अशी हाक मारलेली ऐकून त्या सगळ्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी काजोलच्या सासूबाईंना विचारले, “हे काय? तुझी सून अजूनही तुला ‘आंटीजी’ म्हणते? ‘आई’ अशी हाक का नाही मारत ती तुला?”

त्यावेळी काजोलच्या सासूबाईंनी दिलेले उत्तर काजोलच्या नेहमी लक्षात राहिले. तिच्या सासूबाईंनी परखडपणे आपल्या मैत्रिणींना सांगितले, की “माझी सून जेव्हा मला ‘आई’ अशी हाक मारेल, तेव्हा ती अगदी मनापासून असेल. फक्त नावापुरते ती मला ‘आई’ म्हणणार नाही. तोपर्यंत मी त्या क्षणाची वाट पाहीन.” आपल्या सासूबाईंचे ते विचार ऐकून आपण अगदी त्यांच्या प्रेमातच पडल्याचे काजोलने सांगितले.

त्या दिवसापासून काजोलच्या मनात आपल्या सासूबाईंविषयी अपार प्रेम आणि आदर निर्माण झाल्याचे काजोलने सांगितले. पुढे काजोल त्यांना ‘आंटीजी’ ऐवजी ‘मम्मी’ म्हणू लागली. काजोल सांगते, की माझ्या सासूबाईंनी माझ्यावर कधी कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही. मला नेहमीच त्यांनी माझी स्पेस दिली आहे. मी जशी आहे, तशीच बेधडकपणे त्यांनी मला स्वीकारली.