अल्लू अर्जुन नंतर आता महेश बाबूचा चित्रपटही हिंदीत? लवकरच प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट…

आधी दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शनानंतर कधीतरी हिंदी भाषेत डब होऊन छोट्या पडद्यावर दाखवले जायचे. आता मात्र काळ बदलला आहे. दाक्षिणात्य चित्रपट एकाच वेळी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग वाढीला लागला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी प्रेक्षक कमी नाहीत. त्यामुळे अलीकडे दाक्षिणात्य चित्रपट दाक्षिणात्य भाषांसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘बाहुबली’ हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहे.

प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटाने सुरू केलेला हा ट्रेंड यशच्या ‘केजीएफ’ चित्रपटाने आणि आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाने पुढे चालू ठेवला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाने सर्वत्र कौतुक कमावलेले दिसत आहे. तब्बल सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. यापैकी हिंदी चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. चित्रपटाची गाणी देखील इतर भाषांमध्ये डब करण्यात आल्याने चित्रपटाच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. ‘पुष्पा- द राईज’ चित्रपटाची लोकप्रियता पाहून लवकरच २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या सुप्रसिद्ध ‘अला वैकुंठपुरमलो’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट अधिकृतरीत्या पुन्हा हिंदीत प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.

आता हीच परंपरा पुढे चालू ठेवत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू देखील हिंदी चित्रपटसृष्टीत आपला चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महेश बाबूचा आगामी चित्रपट ‘सरकारु वारी पाटा’ हा हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्या दिशेने या चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमची वाटचाल सुरू असल्याचे कळते. महेश बाबूच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. त्याचा चाहतावर्ग केवळ दक्षिणेपुरताच मर्यादित नाही. आता त्याचा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार असल्याचे कळल्याने त्याचे चाहते खूष झाले आहेत. मात्र याबाबत अजून चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

हिंदी कलाकारांसह दक्षिणेतील कलाकारांचाही मोठा चाहतावर्ग भारतभर उपस्थित आहे. मात्र दक्षिणेतील बहुतांश चित्रपट हे भाषेच्या अडचणीमुळे उत्तर भारतातील चाहत्यांना पाहता येत नाहीत. दक्षिणेतील चित्रपट अधिकृतरीत्या हिंदीत प्रदर्शित होऊ लागले तर याचा सगळ्यांनाच फायदा होईल. जगभरातील हिंदी भाषिक चाहत्यांना या चित्रपटांचा आनंद घेता येईल, तसेच चित्रपटाची प्रसिद्धीही वाढेल. आपल्याकडेही दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हे चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित झाल्यास प्रेक्षकांना आनंदच होणार आहे.