सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर तेजस्विनी पंडीत झाली ट्रोल! दिले असे उत्तर…

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या जीवनचरित्रावर तयार झालेला चित्रपट ‘मी सिंधुताई सपकाळ’ प्रचंड गाजला. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने सिंधुताईंची भूमिका केली होती. सिंधुताईंच्या जाण्यानंतर तेजस्विनीने कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने तिला सोशल मीडिया वर ट्रोल करण्यात येत होते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तेजस्विनीने या ट्रोलिंगला उत्तर दिले आहे.

सिंधुताईंचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडिया वरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडिया वर पोस्ट करण्याची मनःस्थिती आणि वेळ खरंच असतो?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले…. कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का, तर नाही…. पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भानही नसतं.”

तेजस्विनी पुढे लिहिते, “चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला…. कधीच कुणाला नावाने हाक न मारता ‘बाळा’ म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या ‘मी हे आयुष्य जगले आहे, पण तू मला जिवंत केलंस’! ‘अभिनेत्री’ म्हणून, एक तेजस्विनी पंडित आहे बरं का इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारीचा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ती म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.”

लोकांना आवाहन करत ती लिहिते, “लोकहो एक विनंती…. घाई घाईने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या. त्यांना किमान आपल्या कुटुंबियाच्या जाण्यावर शोक व्यक्त करण्या इतका तरी वेळ द्या. तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो. ओम शांती. माई…. -तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई.”