ऊन असो वा बर्फाचे वादळ, सीमेवर तैनात जवान! भारताला आहे यांचा अभिमान!

एखाद्या देशाचे नागरिक तेव्हाच सुखात राहू शकतात, जेव्हा त्यांच्या देशाचे जवान सीमेवर पाय रोवून उभे असतात. भारताच्या सर्व सीमांवर भारतीय सैनिक अहोरात्र पहारा देत असतात, देशाचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आपण आपल्या घरात रात्री सुखाने झोपू शकतो. देशाच्या असंख्य नागरिकांसाठी, त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आपल्या देशाचे सैनिक सदैव सज्ज आणि तत्पर असतात.

या जवानांमुळेच आपल्या देशाचे रक्षण होत आहे. त्यांचे जीवन मात्र नेहमीच खडतर असते. एका जवानाला नेहमीच खडतर परिस्थितीचा सामना करावा लागतो. कोणत्याही परिस्थितीत असले, तरी देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे ऊन, पाऊस, वारा, थंडी यांची पर्वा न करता ते नेहमीच आपले कर्तव्य पार पाडण्यास सज्ज असतात.

अलीकडेच भारताचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीसह अजून दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात या बातमीमुळे हळहळ व्यक्त केली गेली. या सर्वांनाच संपूर्ण भारताने आदरयुक्त श्रद्धांजली वाहिली. भारताच्या या जवानांना अशा पद्धतीने आपल्यातून जाताना पाहून मन बेचैन होऊन जाते.

सगळ्याच जवानांना अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडिया वर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये एक जवान बर्फाच्या वादळात देखील हातात रायफल घेऊन आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. बर्फाचे प्रचंड वादळ सुटले असून अशा गोठवणाऱ्या थंडीत देखील तो जवान देशाच्या रक्षणासाठी सज्ज उभा आहे. अगदी गुडघ्या एवढ्या उंचीचा बर्फ पडला आहे, मात्र हा जवान त्या बर्फात पाय रोवून उभा आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आपण आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाही, परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यागानं ते गाठू शकतो. प्रत्येकाला जगण्यासाठी एकच आयुष्य आहे, पण देशाचा प्रश्न आला तर कोण पाठीशी उभं आहे.” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी या जवानाला आणि एकूणच भारतीय सैनिकांना सलाम ठोकला आहे. कमेंट्स करत भारतीयांनी सैनिकांना आणि त्यांच्या अथक परिश्रमांना सलाम केला आहे. स्वतःची पर्वा न करता देशहित जपणाऱ्या या सैनिकांचा देशाला अभिमान आहे.