‘देवमाणूस २’ मधील ही फॉरेनर अभिनेत्री कोण आहे? जाणून घ्या या नव्या नावाबद्दल…

झी मराठी वाहिनी वर ‘देवमाणूस २’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाने म्हणजे ‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले होते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही मालिका जेव्हा संपली, तेव्हा त्याचा शेवट बघून मालिकेच्या पुढच्या भागाविषयी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. १९ डिसेंबर पासून ‘देवमाणूस २’ मालिका सुरू झाली आहे आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मालिकेच्या सुरुवातीलाच एकीकडे डॉ. अजित कुमारच्या स्मृतिप्रीत्यर्थ कातळवाडीच्या लोकांनी डॉक्टरचा पुतळा बांधून डिंपलच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. दुसरीकडे राजस्थानमधील जैसलमेर येथे देवीसिंग नटवरलाल सिंगचे नाव परिधान करून तेथील लोकांना गंडा घालताना दिसत आहे. हातचलाखी करत तो लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करून दाखवतो. त्याचवेळी तिथे एका फॉरेनरची एंट्री झालेली पाहायला मिळते.

ही फॉरेनर महिला नटवरलाल सिंगला तिच्या जवळची परदेशी चलनातली नोट देऊन ते पैसे दुप्पट करायला सांगते. परदेशी चलन पाहून देवीसिंग काहीसा बुचकळ्यात पडतो. मात्र काही वेळातच तो ती नोट दुप्पट करून दाखवतो. ते पाहून ती महिला देवीसिंगच्या मागे लागते आणि तिला ती जादू शिकवण्याबद्दल विनंती करते. ती सांगते, की ती त्याला त्या बदल्यात खूप पैसे देईल. मात्र त्यानंतर त्या फॉरेनरचा मृत्यू होतो. हे मृत्यू देवीसिंगनेच घडवून आणला आहे, अशी शंका प्रेक्षकांना येत आहे.

या फॉरेनर महिलेची भूमिका केली आहे अभिनेत्री एलेना वेल्टरने. एलेना मूळची जर्मन असून भारतातील अनेक ठिकाणांना ती भेटी देत आहे. यापूर्वी तिने काही जाहिरातींत काम केले आहे. हयात रेजन्सी धर्मशाळा रिसॉर्टच्या काही जाहिरातींमध्ये तिने काम केलेले पाहायला मिळते. मात्र एक अभिनेत्री म्हणून ‘देवमाणूस २’ ही कदाचित तिची पहिलीच मालिका असू शकते. एलेना वेल्टर अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्य देखील करताना पाहायला मिळते. अनेक समाजसेवी संस्थांना ती नेहमी मदत करत असते. काही शाळांमध्ये तिने लेक्चर देखील घेतले आहे.

तर मंडळी, नव्याने सुरू झालेली ‘देवमाणूस २’ ही मालिका तुम्हाला आवडते आहे का? मालिकेतील नवीन कथानक तुम्हाला आवडते आहे का? तसेच मालिकेत आलेले हे नवे वळण तुम्हाला कसे वाटते, ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.