विकी-कतरिना नंतर आता फरहान अख्तर बोहल्यावर! ‘या’ मराठमोळ्या मॉडेलशी बांधणार लग्नगाठ…

नुकतेच विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळाले. या दोघांच्या लग्नाची चर्चा ओसरते न ओसरते तोच आता दुसरे एक सेलिब्रेटी कपल लग्नाच्या बेडीत अडकण्याची तयारी करताना दिसत आहे. हे कपल आहे फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर. लवकरच ते लग्न करणार असून त्यांनी त्यासाठी तयारीही सुरू केली असल्याची बातमी येत आहे.

फरहान अख्तर आपल्या अभिनयाबरोबरच गायकी आणि लेखनासाठीही प्रसिद्ध आहे. ९ जानेवारी १९७४ रोजी जन्मलेला फरहान सध्या ४७ वर्षांचा आहे. शिबानी आणि फरहानची ओळख तीन वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षीच ते लग्न करणार होते. मात्र कोरोना काळात त्यांना ते करता आले नाही. आता देखील लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे समजते.

एका वृत्तानुसार, फरहान आणि शिबानी दांडेकर येत्या मार्च महिन्यात लग्न करणार असल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेल देखील बुक केले आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना सध्या कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. अशात कोणतीही जोखीम पत्करणे सगळ्यांसाठीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे केवळ घरचे आणि काही जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीतच हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जाते.

आपल्या लग्नासाठी इतर गोष्टींची तयारी करताना फरहान आणि शिबानी दिसत आहेत. ते इतरही अनेक गोष्टींची काळजी घेताना दिसत आहेत. याशिवाय त्यांनी बॉलिवूड सेलिब्रेटी डिझायनर सब्यसाची कडून आपल्या लग्नाचे कपडे डिझाईन करून घेतल्याचीही चर्चा आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेले लग्न या दोघांनाही अजून पुढे ढकलायचे नाही. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात दोघे बोहल्यावर चढणार असल्याचे बोलले जात आहे.

शिबानीचा जन्म २७ ऑगस्ट १९८० रोजी झाला असून सध्या ती ४१ वर्षांची आहे. शिबानी सिंगर आणि अँकर आहे. याशिवाय आपण तिला ‘टाईमपास’ चित्रपटातील ‘ही पोली साजूक तुपातली’ या गाण्यात डान्स करतानाही पाहिले होते. फरहान आणि शिबानी सोशल मीडिया वर बरेच सक्रीय आहेत. दोघेही नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करताना दिसतात. आता लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या या नव्या सुरुवातीसाठी आमच्या टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा!