जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराबाबत जाणून घ्या या ८ आश्चर्यकारक गोष्टी!

दक्षिण भारतातील मंदिरे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना. तिरुपती बालाजी मंदिर हे त्यातीलच एक. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील हे मंदिर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमधील एक आहे. या मंदिराचे मूळ नाव श्री व्यंकटेश्वर मंदिर आहे. हे भगवान श्री व्यंकटेश्वर म्हणजेच श्री विष्णू यांचे आसन असून तिरुपती टेकडीच्या सातव्या म्हणजेच वेंकटचल शिखरावर वसलेले आहे. वेंकट टेकडीच्या मालकीमुळे या मंदिराला व्यंकटेश्वर मंदिर म्हटले जाते. या मंदिराबाबत अनेक खास गोष्टी आहेत.

१. मूर्तीची स्थिती: मंदिरात प्रवेश केल्यावर गर्भगृहाच्या मध्यभागी भगवानांची मूर्ती आहे. येथे भाविक पूजाअर्चा करतात. तेथून बाहेर आल्यावर मात्र तिरुपतीची प्रतिमा उजव्या बाजूला असल्याचे दिसून येते.

२. स्त्री आणि पुरुष दोघांची वस्त्रे: श्री व्यंकटेश्वराच्या मूर्तीत देवी लक्ष्मीचाही वास असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मूर्तीला स्त्री आणि पुरुष असे दोघांचेही कपडे परिधान करण्याची रीत आहे.

३. मूर्तीला येतो घाम: मंदिरातील देवाची आकर्षक मूर्ती एका खास दगडापासून बनवण्यात आली आहे. त्यामुळे तिला पाहताक्षणी ती जिवंत वाटते. बालाजीच्या मूर्तीवर थेंब पडलेले दिसतात. त्यामुळे मंदिरातील तापमान कायम कमी ठेवण्यात येते.

४. बालाजीचे गाव: श्री व्यंकटेश्वर मंदिरापासून २३ किमी अंतरावर एक अनोखे गाव आहे. या गावात गावकऱ्यांशिवाय इतर कोणीही प्रवेश करू शकत नाही. गावातील लोक शिस्तप्रिय असून ते नियमांचे काटेकोर पालन करतात आणि आपले आयुष्य सुखासमाधानाने जगतात.

५. न विझणारा दिवा: मंदिरात नित्यनेमाने दिवा लावला जातो. मात्र या दिव्यात तेल किंवा तूप टाकले जात नाही. हा दिवा अखंड तेवत असतो. तो पहिल्यांदा कोणी व कधी लावला, याबद्दल कोणालाच कल्पना नाही.

६. पचाई कापूर: श्री व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला पचाई कापूर लावला जातो. या कापराचे एक वैशिष्ट्य आहे. हा कापूर कोणत्याही दगडाला लावला, की त्याला तडे जातात. मात्र आजपर्यंत भगवान तिरुपतींच्या मूर्तीला कोणताही धक्का पोचलेला नाही.

७. खरे केस: श्री व्यंकटेश्वरांच्या मूर्तीचे केस खरेखुरे असल्याचे बोलले जाते. ते कायम मुलायम असतात आणि त्यांचा कधीच गुंता होत नाही. एखाद्या दगडी मूर्तीवर खरेखुरे केस कसे काय असू शकतात, याबाबत अजूनही कोणताच उलगडा झालेला नाही.

८. लाटांचा आवाज: मंदिरातील भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला कान लावल्यास त्यातून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो, असेही म्हटले जाते. तसेच, ही मूर्ती सतत ओलसर असते असेही म्हटले जाते.