‘मला साऊथचा हिरो बनायचं आहे!’ मराठी ‘श्रीवल्ली’ च्या वल्लीची कथा…

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची सगळीकडे हवा असली तरी मराठीत सध्या या चित्रपटातील गाण्याचे मराठी व्हर्जन लोकप्रिय होताना दिसत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणं अमरावती जिल्ह्यातल्या विजय खंडारेनं मराठीत भाषांतरित करत त्यावर चक्क एक म्युझिक व्हिडिओ देखील बनवला आणि विजय रातोरात स्टार झाला.

अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील निंभोरा बैलवाडी या छोट्याशा गावातील विजय खंडारेचे कुटुंब म्हणजे हातावर पोट असलेली माणसं. विजयच्या वडिलांनी कर्ज काढून गावात २० एकर शेती करायला घेतली, मात्र निसर्गाच्या अवकृपेनं २० एकर शेतीतून केवळ तीन पोती सोयाबीन झालं. तेही पावसानं खराब झालं. कर्ज वाढलं आणि बापानं गावचं घर विकायला काढलं. तिवसा तालुक्याच्या ठिकाणी विजय आपले आई-वडील आणि बहिणीसह भाड्याच्या घरात राहू लागला.

विजयचे वडील हातगाडीवर छोटा धंदा करू लागले, तर विजयने खारे शेंगदाणे विकायला सुरुवात केली. मात्र लॉकडाऊनने पुन्हा उपासमारीची वेळ आणली. विजय चुलत भावासह २०० रुपये रोजंदारीवर हमाली करू लागला. लॉकडाऊनमध्ये हातात वेळ असल्याने आधी टिकटॉक आणि मग युट्यूबवर व्हिडिओ बनवू लागला. वडिलांना हे पसंत नव्हतं, पण हातात पहिला सहा हजाराचा चेक पडल्यावर विजयला जरा हुरूप आला. पुढे त्याची कमाई वाढत गेली आणि अलीकडेच त्यानं गावातलं घर परत विकत घेतलं.

घरी आता सगळेच खूष आहेत. लहानपणापासून विजयचे मित्र त्याला म्हणायचे, की तो साऊथच्या हिरोसारखा दिसतो. त्यामुळे साऊथचा हिरो बनणं हे विजयचं स्वप्न आहे. परिस्थितीमुळे त्याला ते पूर्ण करता आलं नसलं तरी त्याने हार मानलेली नाही. विजयच्या या व्हिडिओमध्ये विजय हिरो आणि त्याची खऱ्या आयुष्यातली श्रीवल्ली म्हणजे त्याची बायको तृप्ती हिरोईन आहेत. एका लग्नात तृप्तीला पहिल्यांदा पाहता क्षणीच विजय तिच्या प्रेमात पडला होता. तृप्ती त्याला नेहमीच साथ देत आली आहे.

‘श्रीवल्ली’ गाणं ऐकून विजयने त्याचं मराठी व्हर्जन बनवायचं ठरवलं. गाण्याचे बोल, चाल या सगळ्याची भट्टी चांगली जमली, मात्र ते शूट करायला पैसे नव्हते. मात्र हार न मानता विजयने ते मोबाईलवर शूट केले आणि महाराष्ट्रातील जनतेने ते उचलून घेतले. या गाण्याचा व्हिडिओ भलेही प्रोफेशनल नसेल, मात्र त्यामागची विजयची मेहनत आणि हेतू जनतेला भावली आहे. या गाण्याचे बोल विजयनेच लिहिले असून त्याने ते गायले देखील आहे.