पाय नसून देखील ती एक अप्रतिम जिम्नॅस्ट आहे, १० वर्षांच्या चिमुरडीची प्रेरणादायी कहाणी…व्हिडिओ पहा

कधी कधी आपण हातपाय धडधाकट असलेली माणसं देखील छोट्या छोट्या अडचणींनी हातपाय गाळून बसलेली पाहतो. मात्र काही लोक येणाऱ्या प्रत्येक अ’ड’चणीवर आपल्या इच्छाशक्तीने मात करत पुढे जातात आणि लोकांसाठी एक उत्तम उदाहरण बनून जातात. आता हेच पाहा ना. या १० वर्षांच्या चिमुरडीने कठीणातल्या कठीण अडचणींवर मात करत जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवलं आहे.

पेज सालेंडाइन ही १० वर्षांची चिमुरडी एक ऍथलिट आहे. अमेरिकेतल्या ओहियो मध्ये ती राहते. ती एक जिमनॅस्ट आहे. मात्र तिचे एक वैशिष्ट्य आहे. तिला जन्मापासूनच दोन्ही पाय नाहीयेत आणि तरीही ती एक उत्तम जिमनॅस्ट आहे. कमरेपासूनच तिला दोन्ही पाय नाहीत. तिचे वेगवेगळ्या कसरती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसतात. या सगळ्यांतून तिची जिद्द आणि अथक परिश्रम दिसून येतात.

पेजच्या आईचे नाव हायडी असून वडीलांचे नाव शॉन आहे. या दोघांनीही आपल्या मुलीच्या बाबतीत खचून न जाता तिला १८ महिन्यांची असल्यापासूनच जिम्नॅस्टीक क्लासला पाठवायला सुरुवात केली. आपल्या मुलीच्या जन्मजात दोषाला तिची कमतरता न बनवता त्याला पेजच्या आईवडीलांनी तिची शक्ती आणि ओळख बनवून टाकलं. आपल्या मुलीला लाचारासारखं जीवन जगायला लावण्यापेक्षा त्यांनी जिम्नॅस्टीकद्वारे तिच्या जगण्याला अर्थ दिला. अर्थात यात पेजच्या इच्छाशक्तीची देखील दाद द्यावी लागेल. आपल्या इच्छाशक्तीने आणि जिद्दीने तिने सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडले आहे.

“तिला आम्ही एक दिव्यांग व्यक्ती म्हणून वागवण्यापेक्षा आम्ही तिला एक सामान्य मुलगी म्हणूनच वाढवलं. यामुळे तिला जगाचा सामना करणं शक्य होईल,” असं पेजचे वडील सांगतात. “जिमनॅस्ट म्हणून ट्रेनिंग सुरू केल्यावर पेजने आम्हाला निराश केले नाही. तिने दाखवून दिले की तिच्यात एक ऍथलिट लपली आहे,” तिचे वडील पुढे सांगतात. आपल्यातल्या या ऍथलिटला तयार करण्यासाठी पेज नियमितपणे ट्रेनिंग घेत आहे.

पेजने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत पदके जिंकली आहेत. पेज म्हणते, “आयुष्यात काहीही होऊ शकतं. तुम्ही फक्त प्रयत्न करत रहा, असे मी लोकांना सांगत असते. आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवा आणि येणाऱ्या अडचणींचा स्वतः सामना करा. मग बनता तुम्ही एक ऍथलिट.” जिम्नॅस्टीक बरोबरच पेजची पोहणे आणि धनुर्विद्या या खेळांमध्येही विशेष रूची आहे. आपल्या खेळाने आणि जिद्दीने ती अनेकांचे प्रेरणास्थान बनली आहे.