सफाई कामगार ते कलेक्टरचा प्रवास..पदरी दोन मुलं आणि नवऱ्याने सोडल्यानंतर देखील सोडली नाही जिद्द!

काही माणसे परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने त्यावर मात करतात आणि समाजाला एक आदर्श घालून देतात. तसेच काहीसे झाले आशा कंडार यांच्या बाबतीत. राजस्थानच्या राहणाऱ्या आशा कंडार महिलांसाठी एक उत्तम आदर्श बनल्या आहेत. १९९७ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर सतराव्या वर्षीच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. पदरी दोन मुलंही झाली. पण २०१२ ला घट’स्फो’ट झाला आणि पदरी एकटेपणाचं जीवन आलं. पदरात दोन मुलं, पण काम काहीच नाही. मुलांचं शिक्षण, कुटुंबाचा खर्च आणि शिक्षण अपुरं. मग सगळ्याचा ताळमेळ जुळवण्यासाठी त्यांनी पडेल ते काम करायला सुरुवात केली.

पण काम करता करता शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी केला. २०१६ साली त्या पदवीधर झाल्या. गंमत म्हणजे, कलेक्टर झालेल्या आशा यांना कलेक्टर म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हते. गुगल वर सर्च करून त्यांनी त्याचा अर्थ माहीत करून घेतला आणि त्याबरोबर कलेक्टर होण्याचा त्यांचा निर्धारही पक्का झाला. गुगल सर्च करून त्यांनी माहिती मिळवली, की आरएएस ची परीक्षा देण्यासाठी घ’ट’स्फो’टित महिलांना वयाची अट शिथिल आहे.

तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही परीक्षा दिली होती आणि परीक्षा दिल्यानंतर बाराच दिवसांनी त्यांना सफाई कामगाराची नोकरी लागली. जोधपूरनगर मध्ये त्यांना ही नोकरी लागली होती. रोज सकाळी त्या पाच-साडेपाच वाजता घर सोडत. सकाळी सहा ते दुपारी दोन अशी त्यांची कामाची वेळ होती. त्यांना दरमहा १२ हजार ५०० रुपये इतका पगार मिळायचा. पण त्यातून केवळ कुटुंबाचा खाण्यापिण्याचा खर्च भागायचा. कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, हे सूत्र मनाशी बाळगत त्यांनी मग पैशांसाठी पडेल ती कामे केली.

सोबत परीक्षेचा अभ्यास सुरू होताच. आपल्या ऍक्टिव्हा मध्ये त्या कायम पुस्तकं ठेवत. कामातून वेळ मिळाला की त्या अभ्यास करायच्या. एखादं झाड, बाजूला मोठ्या काठीचा खराटा आणि पुस्तकात डोकं घालून बसलेल्या आशा हे चित्र जोधपूर नगरनिगम हद्दीत सगळ्यांच्या परिचयाचं झालं होतं. जिथं आया मुलांचा अभ्यास घेतात, तिथे मुलांनी आशा यांचा अभ्यास घेतला. कारण आशा यांनी कलेक्टर व्हावं हे स्वप्न त्या तिघांनी मिळून पाहिलं होतं. आशा यांची मोठी मुलगी पल्लवी आता २१ वर्षांची असून अखेरच्या वर्षात शिकत आहे, तर १९ वर्षीय वृषभ महाविद्यालयात आपलं शिक्षण पूर्ण करतोय.