एखाद्या अभिनेत्यालाही मागे टाकेल इतका हॅन्डसम आहे कतरिनाचा बॉडीगार्ड! महिन्याला घेतो इतका पगार..

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफने सलमान खान बरोबर ‘बॉडीगार्ड’ गाण्यावर डान्स केला होता. पण कतरिना कैफच्या खऱ्या आयुष्यातील बॉडीगार्ड बद्दल तुम्हाला माहीत आहे का?

या बॉडीगार्डचं नाव आहे दीपक सिंग. ६ फूट उंची, भारदस्त शरीरयष्टी, पाहता क्षणी छाप पडेल असं व्यक्तिमत्व. बघता क्षणी मॉडेल वाटावा असा हा दीपक सिंग वेगवेगळ्या सेलिब्रेटीजसाठी बॉडीगार्ड म्हणून काम करतो. दीपकने कतरिना कैफ बरोबरच शाहरुख खान, माधुरी दीक्षित, जॅकलिन फर्नांडिस यांच्यासाठीही बॉडीगार्ड म्हणून काम केले आहे. अभिनेता रोनित रॉयच्या पत्नीने म्हणजेच दीपकची मोठी बहीण नीलमने अनेक वेळा दीपक आणि त्याच्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

दीपकचा जन्म आग्र्यातील हवाई दलातील एका अधिकाऱ्याच्या घरी झाला. आग्रा येथे त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. दीपकला क्रिकेटपटू बनायचे होते. त्यासाठी तो १९९९ मध्ये मुंबईला आला. एका मुलाखतीत दीपकने सांगितले, की “मी क्रिकेट समर कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आलो होतो. मी चंद्रकांत पंडीत यांच्याकडे प्रशिक्षणही घेतले. मात्र दुर्दैवाने मी फक्त महाविद्यालयीन स्तरावर खेळू शकलो आणि लीग मधील प्रवेशपरीक्षा पास करू शकलो नाही. मुलं तशी शाळेपासूनच खेळायला लागतात. मी मात्र उशिरा सुरुवात केली. “

पाच वर्षं प्रशिक्षण घेऊनही दीपकला त्यात यश न आल्याने त्याने वेगळ्या मार्गांचा विचार सुरू केला. त्याने याबाबत आपला मेहुणा रोनित रॉयचा सल्ला घेतला. २००४ मध्ये पदवी पूर्ण करून दीपक एस सिक्युरिटी या कंपनीत जॉईन झाला. त्याची पहिली ऑन फिल्ड असाइनमेंट होती संजय लीला भन्साळीच्या ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी डोअरमन म्हणून.

याबाबत दीपक सांगतो, “मी सुरुवातीपासून काम शिकायला सुरुवात केली. मी दारात उभा राहून लोकांसाठी दार उघडायचो. सिनियर्सना फिल्ड वर पाहून खूप काही शिकायला मिळालं. मॉरिशस मध्ये पार पडलेल्या झी सिने अवॉर्ड्स दरम्यान अभिनेत्री राणी मुखर्जीची काळजी घेणं ही माझी पहिली प्रमुख जबाबदारी होती.” काही काळानंतर त्याला आमिर खान, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख यांसारख्या हाय-प्रोफाइल लग्नसमारंभ देखील हाताळण्याचे काम मिळाले. हॉलिवूड स्टार पॅरिस हिल्टन आणि जॉन ट्रॅव्होल्टा भारतात चित्रीकरणासाठी आल्यावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही दीपकने सांभाळली होती.

आपल्या ड्रेसकोड बद्दल तो फार दक्ष असतो. ‘जेव्हा तुम्ही व्हीआयपी सोबत असता तेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल राहणं गरजेचं असतं,’ असं तो म्हणतो. त्याला अनेकदा चित्रपटात काम करण्याच्याही ऑफर्स येतात, मात्र त्याला आपल्या क्षेत्रातच काम करायचे असून त्याला आपल्या क्षेत्रातील शाहरुख खान बनायचे आहे.