‘अफवांवर विश्वास ठेवू नका!’ ‘लागिरं झालं जी’ फेम आज्याचे आवाहन…

सध्या सोशल मीडिया वर एक बातमी बराच धुमाकूळ माजवताना दिसत आहे. ही बातमी आहे ‘लागिरं झालं जी’ मधील एका अभिनेत्याच्या निधनाची. एका वृत्तपत्रामध्ये ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील मुख्य कलाकार नितीश चव्हाण याच्या फोटोसह त्याच्या निधनाची बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीने सगळीकडे एकच हाहाकार माजला. नितीशने ‘लागिरं झालं जी’ मालिकेत आज्याची भूमिका केली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी प्रसिद्ध झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.

मात्र ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत खुद्द नितीशनेच एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील नितीश चव्हाण आणि इतर काही कलाकार चांदवडी येथे फिरण्यासाठी गेले असताना त्यांना सोशल मीडिया वर नितीशच्या अपघाती निधनाची बातमी समजली. हा गैरसमज दूर करण्यासाठी तिथूनच नितीशने एक व्हिडिओ शूट करत चाहत्यांना तो ठीक असल्याच्या बातमीने आश्वस्त केले आहे.

त्याने सांगितले, की तो अतिशय उत्तम स्थितीत असून त्याचा कोणताही अपघात झालेला नाही आणि त्यामुळे चाहत्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. यावेळी त्याने सांगितले, की ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील एका कलाकाराचे अपघाती निधन झाले आहे. मात्र तो मी नसून ज्ञानेश माने नावाचे बारामतीचे कलाकार आहेत ज्यांचे अपघाती निधन झाले आहे. तसेच ज्ञानेश माने यांना जाऊन ३ ते ४ दिवस झाल्यानंतर आता ही बातमी चक्क नितीशच्या फोटोसह प्रसिद्ध केली गेल्याने नितीशने चाहत्यांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी नजरचुकीने प्रसिद्ध झाली असल्याची शक्यताही यावेळी नितीशने बोलून दाखवली. त्यामुळे ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील आज्या म्हणजे नितीश चव्हाणचे अपघाती निधन झाले नसून ज्ञानेश माने या कलाकाराचे निधन झाले असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे नितीशच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

नितीश आपल्या कलाकार मित्रमंडळींसोबत साताऱ्यातील चांदवडी येथे फिरायला गेलेला असताना त्या सगळ्यांना सोशल मीडिया वरून नितीशच्या निधनाची बातमी समजली. ‘लागिरं झालं जी मालिकेतील कलाकाराचे अपघाती निधन’ ही बातमी जरी खरी असली, तरी बातमीतील नितीशच्या फोटोमुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. मात्र आता नितीशने हे सगळे गैरसमज स्वतःहून दूर केल्याने नितीशच्या निधनाची बातमी केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.