बाबांच्या पहिल्या श्राद्धाला लता मंगेशकरांनी आपल्या भावंडांसोबत घेतल्या होत्या या ४ शपथा..

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं काही दिवसांपूर्वी वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झालं. या लता दीदींच्या आयुष्यात आणि त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या वडीलांचा मोलाचा वाटा आहे. लता मंगेशकर यांचे वडील पंडीत दीनानाथ मंगेशकर स्वतः संगीतविश्वातील एक नामांकित नाव. एक उत्तम शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत म्हणून त्यांचा लौकिक. पंडीत दीनानाथ आणि शेवंता मंगेशकर यांच्या घरी २८ सप्टेंबर १९२९ रोजी एका कन्यारत्नाचा जन्म झाला. त्याच या लता दीदी.

लता दीदींना गायनाची तालीम घरातूनच मिळत गेली. त्यांचे वडील त्यांच्याकडून तासनतास गायनाचा रियाज करून घेत. लता दीदी १३ वर्षांच्या असताना त्यांचे वडील गेले आणि त्यांची चार भावंडं आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ यांची जबाबदारी लता दीदींवर पडली. त्या नोकरी करून आपली हलाखीची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागल्या.

पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या पहिल्या श्राद्धाच्या वेळी मीना आणि आशा यांची २१ प्रकारच्या भाज्यांसह सर्व जेवण व्यवस्थित बनवलं होतं. मात्र लता दीदींच्या आई म्हणजेच माई यांना ते फारसं पटलं नाही. त्यामुळे त्यांनी पंडीत दीनानाथ यांच्या आवडीचं चांदीचं एक ताट विकलं. त्यावर संतापाने लता दीदींनी विचारलं, “तू बाबांचं आवडीचं ताट का विकलंस?” त्यावर माई म्हणाल्या, “हे माझ्या मालकांचं श्राद्ध आहे. कोणा सोम्यागोम्याचे नाही. ज्या वैभवात, थाटामाटात ते राहिले त्याच थाटामाटात त्याच श्राद्ध व्हायला हवं. चांदीच्या एका ताटासाठी काय अश्रू गाळतेस? तू मालकांसारखी गात राहिलीस तर चांदीच्या काय सोन्याच्या नाण्यांचा तुझ्यावर वर्षाव होईल.” आपल्या मुलांनी वडीलांसारखं व्हावं म्हणून माई त्यांना पंडीत दीनानाथ यांची नाटकं वाचून दाखवित असत.

श्राद्धाच्या वेळी जेव्हा पिंडदानाची वेळ आली तेव्हा काही केलं तरी पिंडाला कावळा शिवायला तयार नव्हता. तासभर कावळ्याची वाट पाहिल्यानंतर माई मुलांना म्हणाल्या, “तुम्हा पाच भावंडापैकी कोणीतरी काहीतरी चूक केली आहे म्हणून कावळा काही पिंडाला शिवत नाही आहे. तुम्ही पाचजण मिळून काहीतरी प्रतिज्ञा करा म्हणजे कावळा पिंडाला शिवेल.” मग पाचही भावंडानी पहिली प्रतिज्ञा केली ती रोज संगीताचा रियाज करण्याची, दुसरी प्रतिज्ञा केली नेमानं बाबांचं श्राद्ध करण्याची आणि तिसरी प्रतिज्ञा केली ती बाबांच्या श्राद्धादिवशी संगीताचा कार्यक्रम करण्याची. मात्र तरीही कावळा पिंडाला शिवला नाही. अखेर चौथी प्रतिज्ञा केली, की संगीताशिवाय आम्ही दुसरं काहीही करणार नाही. तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवला.