‘पुष्पा’ चित्रपटात मंगलम श्रीनूच्या भूमिकेला आहे या मराठमोळ्या अभिनेत्याचा दमदार आवाज!

‘पुष्पा’ बस नाम ही काफी है! सध्या सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. ‘पुष्पा’ हा दाक्षिणात्य चित्रपट सगळीकडेच धुमाकूळ घालताना दिसत आहे. गाणी, संवाद, दमदार स्टारकास्ट अशा या चित्रपटाच्या अनेक बाजू आहेत ज्या प्रेक्षकांना मनापासून आवडून गेल्या आहेत. हा चित्रपट तब्बल सहा भारतीय भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. यातील हिंदी डबिंग तर तुफान लोकप्रिय झाले आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. हिंदी मध्ये अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पराज’ या पात्रासाठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज देण्यात आला आहे. तर रश्मिका मंदानाच्या ‘श्रीवल्ली’ या पात्रासाठी गायिका स्मिता मल्होत्राने आवाज दिला आहे. स्मिता मल्होत्रा ही एक डबिंग आर्टिस्ट देखील आहे. पुष्पाचा मित्र केशव याला अभिनेता साहिल वैद्यने आवाज दिला आहे. साहिल सध्या बॉलिवूडमध्ये आपला जम बसवू पहात आहे. ‘शेरशहा’ चित्रपटात त्याने मुख्य नायकाच्या मित्राची भूमिका साकारली होती.

‘पुष्पा’ चित्रपटातील अजून एका पात्राला एका मराठमोळ्या अभिनेत्याने आपला आवाज दिला आहे. हा आवाज आहे अभिनेते उदय सबनीस यांचा. उदय सबनीस यांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील खलनायक मंगलम श्रीनूला आपला आवाज दिला आहे. उदय सबनीस हे अभिनेते असण्यासोबतच डबिंग आर्टिस्ट म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक टॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांसाठी हिंदी डबिंग केलं आहे. शिवाय अनेक ऍनिमेशनपटांना देखील आपला आवाज दिला आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल एक हजारपेक्षा जास्त व्यक्तिरेखांना आपला आवाज दिला आहे. आपल्या आवाजातील योग्य चढ-उतारांमुळे ते एक डबिंग आर्टिस्ट म्हणून लोकप्रिय झाले आहेत.

उदय सबनीस यांच्या प्रमाणेच संकेत म्हात्रे या मराठमोळ्या डबिंग आर्टिस्टनेही डबिंगच्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. खरंतर ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी सगळ्यांची पसंती संकेत म्हात्रेलाच होती. कारण अल्लू अर्जुनचे आजपर्यंत जेवढे चित्रपट हिंदीमध्ये डब झाले आहेत, तेवढ्या सगळ्या चित्रपटांसाठी संकेतने अल्लू अर्जुनला आवाज दिला आहे. त्यामुळे श्रेयस तळपदेची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली तेव्हा अनेक लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

मात्र जेव्हा श्रेयसच्या आवाजातील चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. श्रेयसने खूप उत्तम डबिंग केलं असून त्याचा आवाज अल्लू अर्जुनला परफेक्ट सूट होत असल्याची दाद अनेकांनी दिली.