नादखुळा! पुण्यातल्या गाणाऱ्या पोलिसाचा ‘श्रीवल्ली’ रिमेक व्हायरल! ऐका मराठी रिमेक…

काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सर्वत्र एकच धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. यातील संवाद हल्ली ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकू येत आहेत. तर यातील गाण्यांनीही सोशल मीडिया वर धुमाकूळ घातलेला दिसत आहे. या गाण्यांची खासियत ही आहे की त्यांचे आता मराठी रिमेक बनू लागले आहेत. अलीकडेच या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचा मराठी रिमेक अमरावतीच्या विजय खंदारे यांनी बनवला होता. तो चांगलाच लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचप्रमाणे त्याचा अजून एक मराठी रिमेक सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.

हा रिमेक बनवला आहे पुण्याचे ‘गाणारे पोलीस’ म्हणून प्रसिद्ध असलेले आतिष खराडे यांनी. आतिष यांनी या आधी श्रीलंकन गायिका योहानीच्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्याचाही मराठी रिमेक बनवला होता. तो देखील बराच लोकप्रिय झाला. आता ते एक नवा रिमेक घेऊन आले आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचा त्यांनी रिमेक बनवला आहे. हे रिमेक सॉंग त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेल वर अपलोड केले असून याला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठी भाषेत या गाण्याचा रिमेक बनवून त्यांनी लोकांना आश्चर्यचकित करून सोडलं आहे. मात्र त्यांच्या आवाजातील या गाण्याने अनेकांना वेड लावलेलेही दिसून येत आहे. आतिष आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून अशी गाणी बनवत असतात. लोकांचा या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांची इतरही अनेक गाणी त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेल वर अपलोड केली आहेत. लोकांना त्यांची ही गाणी खूपच पसंत पडत आहेत.

आतिष खराडे यांना शाळेत असल्यापासूनच गाण्याची आवड होती. मात्र पोलिसांची नोकरी करणे देखील त्यांना भाग होते. त्यामुळे त्यांना गायकीचे प्रशिक्षण घेता आले नाही. मात्र आपल्या या व्यस्त आणि धकाधकीच्या आयुष्यातही त्यांनी आपल्या या छंदाला कोमेजू दिले नाही. पोलिसांचे काम खूपच तणावग्रस्त असते. अशा तणावपूर्ण वातावरणातून थोडा विसावा मिळावा म्हणून त्यांनी आपला गाण्याचा छंद जोपासणं सुरू ठेवलं आहे. नव्या गाण्यांचे रिमेक बनवण्यासोबतच ते रॅप गाणीही लिहितात आणि ती स्वतः गातात देखील.

मित्रांनो, तुम्हाला आतिष यांचा हा ‘श्रीवल्ली’ मराठी रिमेक कसा वाटला, ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.