गाडी चालवताना ड्रायव्हरला आली फीट! प्रसंगावधान दाखवत पुण्याच्या महिलेने घेतलं स्टेअरिंग हाती, केले दवाखान्यात दाखल..

महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या पेक्षा कमी नाहीत असे म्हटले जाते. मात्र अडचणीच्या वेळी प्रसंगावधान राखत त्यावर निर्णय घेणाऱ्या महिलांची गोष्टच वेगळी असते. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. या महिलेने प्रसंगावधान राखत गाडीचे स्टिअरिंग व्हील हाती घेतले आणि केवळ ड्रायव्हरचेच नाही, तर गाडीतील इतर प्रवाशांचेही प्राण वाचवले.

पुण्याच्या वाघोलीतील २२ ते २३ महिलांचा एक ग्रुप शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे फिरण्यासाठी चालला होता. या सर्व महिला मिनी बस मधून प्रवास करत होत्या. गाडी चालवताना अचानक बसच्या ड्रायव्हरला फीट आली. ते पाहून गाडीतील एक महिला योगिता धर्मेंद्र सातव या समोर आल्या आणि त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचे स्टिअरिंग व्हील हाती घेतले. त्यांनी गाडी चालवत गावापर्यंत आणली. विशेष म्हणजे योगिता सातव यांचा बस चालवण्याचा हा पहिलाच अनुभव होता.

बस गावात आल्यानंतर लगेचच ड्रायव्हरला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने ड्रायव्हरच्या जीवाचा धोका टळला. त्यानंतर दुसऱ्या ड्रायव्हरला बोलावण्यात आले. पुढे या ड्रायव्हरने बसचा ताबा घेत या महिलांच्या ग्रुपला तेथून ४० किलोमीटर वर असलेल्या वाघोलीपर्यंत सोडले.

दरम्यान, अशा कठीण प्रसंगी प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हरचे आणि गाडीतील इतर महिलांचे प्राण वाचवल्याबद्दल योगिता सातव यांचे कौतुक होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व स्तरातून योगिता सातव यांचे कौतुक होताना दिसत आहे. यासाठी योगिता यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला आहे.

वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव-पाटील यांनी सहलीच्या आयोजक आशा वाघमारे यांच्यासह योगिता यांचा घरी जाऊन सत्कार केला. योगिता यांच्या धाडसाबद्दल आणि प्रसंगावधानाबद्दल कौतुक करताना जयश्री सातव-पाटील म्हणाल्या, “चारचाकी वाहने बहुतेक महिला चालवतात. पण परिस्थिती गंभीर असताना बस चालवण्याचे मोठे धाडस वाघोलीतील योगिता सातव यांनी दाखवले. तसेच चालकासह सर्व सहकारी महिलांचे प्राण वाचवले.”

महिला आज सर्वच क्षेत्रात बाजी मारताना दिसत आहेत. मात्र योगिता सातव यांच्या सारख्या काही महिला अशाही आहेत ज्या रोजच्या जीवनातही कठीण प्रसंगांमध्ये आघाडी घेताना दिसत आहेत. योगिता सातव यांच्या प्रसंगावधानाचं आणि धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्या या धाडसामुळे आज अनेक जणांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या शौर्याला आमचा सलाम!