‘श्रीवल्ली’ गाण्यावर थिरकली राणू मंडल! नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स…

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ या चित्रपटानं सध्या सगळीकडेच आपली हवा केली आहे. मग ते बॉक्स ऑफिस असो वा सोशल मीडिया, ‘पुष्पा’ ची हवा तर सगळीकडेच आहे. बॉक्स ऑफिस वर गल्ला जमवता जमवता या चित्रपटाने सोशल मीडिया वरही बराच धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. या चित्रपटातील गाण्यांवर आणि संवादांवर अनेकांनी रिल्स बनवत नेटकऱ्यांची वाहवा देखील मिळवली आहे.

असाच प्रयत्न राणू मंडलने देखील केला आहे. राणूने ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर आपला डान्स करतानाचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडिया वर शेअर केला आहे. यामधील तिचा विनोदी डान्स बघून अनेक नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी मात्र तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. काहीही कारण असो, तिचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेला दिसून येत आहे.

अनेकांनी तिच्या या व्हिडिओ वर कमेंट करत ‘हा व्हिडिओ तर अल्लू अर्जुन पर्यंत पोचलाच पाहिजे’ असेही मस्करीत म्हटले आहे. काहींनी राणूचा हा डान्स पाहून तिला उपचारांची गरज असल्याचे म्हटले आहे. तर काहींना राणूचा हा विनोदी डान्स बघून हसू आवरणे कठीण झाले. काहींनी तिचे कौतुकही केले आहे.

एकेकाळी राणू मंडल रेल्वे प्लॅटफॉर्म वर गाणी म्हणत आपली गुजराण करायची. एके दिवशी संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने तिला लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गाताना पाहिले. तेव्हा त्याला तिचा आवाज खूप आवडला. हिमेशने तिला आपल्या एका अल्बमसाठी एक गाणे गाण्याची संधी दिली. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आणि राणू मंडल रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली.

मात्र त्यानंतर तिला इंडस्ट्री मध्ये कोणतीच संधी मिळाली नाही. हिमेशने दिलेल्या संधीमुळे इंटरनेट स्टार बनलेली राणू नंतर अंधारात गेली. तिला मिळालेले वैभव ती टिकवू शकली नाही आणि पुन्हा तिच्यावर उपासमारीची वेळ आली. आता ती सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असलेली पाहायला मिळते. मात्र त्यामुळे तिचे गेलेले वैभव तिला परत मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

मनोरंजन विश्वातल्या अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना फॉलो करा. तसेच तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.