‘बचपन का प्यार’ फेम या चिमुकल्याचा अपघात! रॅपर बादशाहची प्रार्थना करण्याची विनंती…

काही दिवसांपूर्वी ‘बचपन का प्यार’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत होता. एका लहान मुलाने त्याच्या आवाजात ‘बचपन का प्यार’ हे गाणे म्हटले होते. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, की चक्क प्रसिद्ध रॅपर बादशाहला त्यावर गाणे बनवावेसे वाटले. या व्हिडिओ मधील तो मुलगा होता सहदेव दिर्दो. त्या गाण्याबरोबरच सहदेवही प्रसिद्ध झाला. रॅपर बादशाहने त्याच गाण्यावर नवीन रॅप बनवले आणि या सहदेव सोबत त्या रॅपच्या म्युझिक व्हिडिओ मध्ये कामही केले. या गाण्यालाही बरीच प्रसिद्धी मिळालेली पाहायला मिळाली.

याच सहदेवचा अपघात झाल्याची बातमी रॅपर बादशाहने सोशल मीडिया वर शेअर केली आहे. एका दुचाकीवरून प्रवास करत असताना १० वर्षांच्या सहदेवचा छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर काही लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले.

रॅपर बादशाहने मंगळवारी (२८ डिसेंबर) रात्री ट्विट करत सांगितले, की तो सहदेवच्या भेटीला चालला आहे. त्याने सांगितले, “सहदेवचे कुटुंबीय आणि मित्रांच्या मी सतत संपर्कात आहे. तो बेशुद्धावस्थेत आहे. मी त्याच्या पाठीशी आहेच. तुमच्या प्रार्थनांचीही मला गरज आहे.” दरम्यान, सहदेव त्याच्या बाईकवरून गावी परत येत असताना हा अपघात झाल्याचे कळते. त्याच्यासोबत त्याचे वडील होते अशी बातमी आहे. मंगळवारी (२८ डिसेंबर) हा अपघात झाला. या अपघाताच्या वेळी सहदेवने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

त्याच्यावर सुकमा जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्याला पुढील उपचारांसाठी जगदलपूर मधील मेडिकल कॉलेजमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर इजा झाल्याने अपघातानंतर सहदेव बेशुद्ध होता. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

दहा वर्षांच्या सहदेवने ‘बचपन का प्यार’ हे गाणं जवळपास दोन वर्षांपूर्वी गायलं होतं. त्याचा हा व्हिडिओ अलीकडच्या काळात अचानक व्हायरल झाला. तो टीका व्हायरल झाला, की अनेक सेलिब्रेटींनी त्यावर आपले इन्स्टा रिल्स बनवले. रॅपर बादशाहने तर चक्क या गाण्यावर आपल्या स्टाईल मध्ये एक रॅप बनवून टाकले. त्यामुळे या गाण्याची आणि पर्यायाने सहदेवचीही प्रसिद्धी अजून वाढली. त्यामुळे आता या चिमुकल्याची प्रकृती स्थिर व्हावी आणि तो यातून लवकर बरा व्हावा, यासाठी लोक प्रार्थना करत आहेत.