या मोठ्या कारणांमुळे रतन टाटा यांनी केले नाही लग्न..कारण जाणून थक्क व्हाल..

२८ डिसेंबर रोजी रतन टाटा यांनी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. या वयातही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे. आपल्या कामात व्यस्त असणारे रतन टाटा यांनी कधीच लग्न का केले नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर जाणून घेऊया त्याचे कारण.

एका मुलाखतीत रतन टाटा यांनी स्वतःच आपल्या लव्ह लाईफ बद्दल खुलासा केला होता. त्यांनी सांगितले, की आयुष्यात तब्बल चार वेळा त्यांनी लग्नाबद्दल गंभीरपणे विचार करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. रतन टाटा चक्क प्रेमातही पडले होते आणि त्यावेळी त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र तेही घडू शकले नाही. मुलाखतीत सांगताना ते म्हणाले, की आपण प्रेमात पडलो होतो, मात्र प्रेमाचे रूपांतर लग्नात करू शकलो नाही.

दूरचा विचार करता आपला अविवाहित राहण्याचा निर्णय योग्य होता, असे टाटा सांगतात. कारण लग्न केले असते, तर परिस्थिती गुंतागुंतीची झाली असती. ज्यावेळी ते अमेरिकेत होते, त्यावेळी ते प्रेमाच्या आणि लग्नाच्या बाबतीत फार गंभीर झाले होते. मात्र त्यावेळी त्यांना भारतात परत यायचे होते. रतन टाटा यांच्या प्रेयसीची भारतात येण्याची इच्छा नसल्याने ते लग्न होऊ शकले नाही. पुढे तिने अमेरिकेतीलच एका व्यक्तीशी लग्न केले. त्याबद्दल टाटा यांना प्रश्न विचारण्यात आला, की ती अजूनही त्या शहरात आहे का. त्यावर टाटांनी केवळ एका शब्दात ‘हो’ असे उत्तर देत अधिक संदर्भ देणं टाळलं.

२८ डिसेंबर १९३७ रोजी रतन टाटा यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. मात्र त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांचे पालक विभक्त झाले आणि रतन टाटा यांचा सांभाळ त्यांच्या आजीला करावा लागला. रतन टाटा यांना कारचा प्रचंड छंद आहे. त्यांच्या देखरेखीत टाटा समूहाने लँड रोव्हर, जॅग्वार, रेंज रोव्हर सारख्या कंपन्या विकत घेतल्या. सामान्य जनतेला टाटा नॅनोची भेटही रतन टाटांनीच दिली आहे.

याशिवाय त्यांना पियानो वाजवण्याचा आणि विमान उडवण्याचा छंद आहे. १९६१ मध्ये त्यांनी टाटा स्टील मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१३ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्ती घेतल्यानंतर ते आपला पियानो वाजवण्याचा आणि विमान उडवण्याचा छंद जोपासताना दिसत आहेत. निवृत्तीनंतर त्यांना त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी वेळ द्यायचा होता.