‘केजीएफ चॅप्टर २’ ची रिलीज डेट जाहीर! यशच्या वाढदिवसादिवशी केली घोषणा…

दाक्षिणात्य अभिनेता यश याचा ८ जानेवारी रोजी वाढदिवस झाला. चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचा वाढदिवस साजरा केला. मात्र चाहत्यांना यशच्या वाढदिवसादिवशी एक खूप मोठं सरप्राईज मिळालं आहे. यशला ‘केजीएफ’ या चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. याच चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली होती.

यशच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या मेकर्सनी यशच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. यशच्या वाढदिवसादिवशीच त्यांनी ‘केजीएफ चॅप्टर २’ चे पोस्टर रिलीज केले आहे. याशिवाय या चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. येत्या १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये यशचा खतरनाक लूक दिसतो आहे. केवळ हा लूक पाहूनच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

‘केजीएफ’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता. त्यानंतर त्याच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोना काळात या चित्रपटाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात येत होती. ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे तसं करता आलं नाही. त्यामुळे या चित्रपटाचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कळल्याने चाहत्यांमध्ये नवा उत्साह संचारलेला दिसत आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. तब्बल ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडिया वर लाँच करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ‘सावधान! पुढे धोका आहे! माझ्या रॉकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! १४ एप्रिल २०२२ ला या राक्षसाला जग जिंकताना पाहायची अजून वाट बघू शकत नाही,’ असे ट्विट करत त्यांनी यशचा पहिला लूक रिलीज केला.

यशच्या आणि ‘केजीएफ’ च्या चाहत्यांसाठी ही खरंच खूप मोठी बातमी आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. १४ एप्रिलला कळेलच, की प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी किती आसुसले होते. ‘केजीएफ’ चित्रपटाने सगळीकडेच खूप यश मिळवले आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ ला देखील असेच यश मिळेल अशी खात्री वाटते. काय मग मंडळी, तुम्हालाही ‘केजीएफ चॅप्टर २’ ची उत्सुकता लागून राहिली आहे ना? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.