घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समंथा आणि नागा चैतन्य समोरासमोर! असे झाले रिऍक्ट…

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य बरेच चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. कारण होतं दोघांचा घटस्फोट. २ ऑक्टोबर २०२१ रोजी या दोघांनीही आपल्या घटस्फोटाची घोषणा केली होती. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. २०१० पासून समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर चार वर्षांनी दोघेही विभक्त झाले.

घटस्फोट घेताना दोघांनीही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात चित्र काहीतरी वेगळेच असल्याचे समोर आले आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर समंथाला त्यावरून ट्रोल केलं गेलं होतं. मात्र तिने त्या ट्रोलर्सची चांगलीच कानउघाडणी केली आहे. दोघांनीही घटस्फोटाबद्दल फारसे काही सांगितले नव्हते. मात्र काही काळानंतर दोघेही यावर थोडे थोडे बोलते होऊ लागले आहेत.

अलीकडेच दोघे घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले. दोघांनीही आधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू असे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना तसं करणं जमलेलं दिसत नाही. कारण हे दोघेही जेव्हा एकमेकांसमोर आले, तेव्हा ते एकमेकांना टाळताना दिसत होते. सूत्रांच्या माहिती नुसार, सध्या समंथा आणि नागा चैतन्य दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहेत. या दोघांच्याही आगामी चित्रपटांचं चित्रीकरण हैदराबाद मधील रामनायडू स्टुडिओ मध्ये सुरू आहे.

समंथा सध्या ‘यशोदा’ चित्रपटाचं चित्रीकरण करत असून नागा चैत्यन्य त्याच्या आगामी ‘बंगाराजू’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दोघांचेही सेट जवळजवळ आहेत. त्यामुळे हे दोघेही वरचेवर एकमेकांसमोर येताना दिसत आहेत. मात्र समोर आल्यानंतर दोघेही एकमेकांच्या नजरा चुकवत एकमेकांपासून अंतर राखून वागत असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दोघांचीही टीम या दोघांची प्रत्यक्ष भेट होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे लग्न फारच धूमधडाक्यात पार पडले होते. इतकी वर्षं एकत्र राहिल्यानंतरही दोघांनी जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दोघांच्याही चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. दोघांनी आपला घटस्फोट जाहीर करण्याआधी त्यांच्या वेगळे होण्याच्या अनेक बातम्या येत होत्या. मात्र त्यावेळी अनेकांना ही बातमी खरी वाटली नाही. पण दोघांनी या बातमीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर मात्र सगळेच अवाक झाले होते.