संजय राऊत यांनी धरला सुप्रिया सुळेंसोबत ठेका! ‘लंबोर्गिनी…’ गाण्यावर केला भन्नाट डान्स…

राजकीय स्थित्यंतरं आणि राजकारण्यांच्या एकमेकांवरील कुरघोड्या काही नवीन नाहीत. वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच राजकारण्यांमध्ये कधी युती तर कधी फुटी झालेली पाहायला मिळते. सतत एकमेकांवर चिखलफेक, कधी विरोधकांची टर उडवणे, तर कधी युती झालेल्या पक्षाला पाठींबा देणे, अशा एक ना अनेक गोष्टी राजकारणात घडताना आपण पहात असतो. मात्र हेच राजकारणी कधीतरी अशा काही गोष्टी करून जातात की बघणाऱ्याने तोंडात बोट घालून बघतच राहावे.

राजकारणी म्हटलं की तो केवळ राजकारणच करणार असे चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची लगबग पाहिली असता कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही. त्याला कारणही तसेच घडले आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचे २९ नोव्हेंबर रोजी लग्न झाले. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार बरोबर पूर्वशीचे लग्न झाले. यासाठी संजय राऊत अनेक राजकारण्यांना भेटून लग्नाचे आमंत्रण देताना दिसले होते. नेहमी आपल्या सडेतोड वक्तव्यांनी चर्चेत असलेले संजय राऊत आपल्या मुलीच्या लग्नात प्रचंड व्यस्त असलेले दिसले.

संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाआधी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमालाही अनेक राजकीय व्यक्तींनी हजेरी लावलेली दिसून आली. इतकेच नाही, तर याच संगीत कार्यक्रमात सगळ्यांनी धमाल आणलेली दिसत आहे. या कार्यक्रमाच्या वेळचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सहकुटुंब या समारंभाला हजेरी लावली होती.

सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना डान्स करण्याचा आग्रह केला आणि दोघेही एका गाण्यावर ठेका धरताना दिसून आले. दोघांनीही या गाण्यावर धमाल डान्स केलेला पाहायला मिळाला. या प्रसंगी संजय राऊत यांच्या सुविद्य पत्नी वर्षा राऊत देखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांच्या आग्रहाखातर त्यांनीही नंतर डान्सचा आनंद लुटलेला पाहायला मिळाला.

रेनेसॉं या सप्ततारांकित हॉटेल मध्ये हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांनी हा कार्यक्रम एंन्जॉय केला. सुप्रिया सुळे यांनी लावलेली सहकुटुंब हजेरी लक्षवेधी ठरली. या निमित्ताने पुन्हा एकदा संजय राऊत आणि पवार कुटुंबातील घरोबा समोर आला आहे.