श्रुती हसनला करायचे होते समंथाच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याशी लग्न! काय आहे ही कहाणी?

२८ जानेवारी रोजी अभिनेत्री श्रुती हसनने आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. १९८६ मध्ये जन्माला आलेली श्रुती हसन ही प्रसिद्ध अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिने बरेच नाव कमावले आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत लक, गब्बर इज बॅक, वेलकम बॅक अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. श्रुतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमुळे तिचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

श्रुती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. कधी तिचे काम तर कधी तिचे वैयक्तिक आयुष्य. आपल्या लव्ह लाईफ मुळेही ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. पण तुम्हाला माहीत आहे का मंडळी, की श्रुतीला नागा चैतन्यशी लग्न करायचे होते?

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यचे समंथा सोबत लग्न होण्याआधी श्रुती हसन बरोबर अफेयर होते असे म्हटले जाते. प्रसार माध्यमांमध्ये या प्रकरणाची त्यावेळी बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. २०१३ मध्ये या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंड तर्फे झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघे नेहमीच एकत्र दिसू लागले. त्यामुळे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. २०१३ मध्ये झालेल्या फिल्म फेयर अवॉर्ड शो दरम्यान दोघांमध्ये असलेली जवळीक पाहून अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत आला होता.

मात्र नंतर दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. याचे कारण श्रुतीची बहीण अक्षरा असल्याचे सांगितले जाते. अक्षरा, श्रुती आणि नागा चैतन्यची भेट एका शो दरम्यान झाली होती. श्रुतीला शो मध्ये परफॉर्म करायचे असल्याने तिने नागा चैतन्यला आपली बहीण अक्षराला घरी सोडण्यास सांगितले. मात्र नागा चैतन्यला काही कामासाठी निघावे लागले आणि तो अक्षराला सोडू शकला नाही. त्यामुळे रागाने श्रुतीने नागा चैतन्यशी बोलणे बंद केले, असा मीडियाचा दावा आहे.

काही वर्षांनी मात्र हे दोघे एका चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलेले पाहायला मिळाले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमम’ चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली. हे दोघे खऱ्या आयुष्यात पुन्हा एकत्र येणार असं वाटत असतानाच नागा चैतन्यने २०१७ मध्ये अभिनेत्री समंथाशी लग्न केले आणि आता लग्नानंतर चार वर्षांनी दोघे वेगळेही झालेले पाहायला मिळत आहेत.