‘बिग बॉस मराठी ३’ अपडेट: सोनालीला वाटते ‘या’ स्पर्धकाची भीती! मीनलचे यावर मत काय…?

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ आता मध्यंतरात येऊन पोचला आहे. ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस स्पर्धक बिग बॉसच्या घरात रहात आहेत. आधी सगळेच स्पर्धक ग्रुपने खेळायचे. आता मात्र प्रत्येक स्पर्धक आपला आपला स्वतंत्र खेळताना दिसत आहे. असे असतानाही काही स्पर्धक आपल्या स्वतंत्र खेळाबरोबरच इतर स्पर्धकांसोबतही स्ट्रॅटेजी आखताना दिसून येत आहेत.

अलीकडेच बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना ‘जपून दांडा धर’ हा टास्क देण्यात आला होता. यावेळी स्पर्धक एकमेकांबरोबर चर्चा करत या टास्कसाठी स्ट्रॅटेजी आखताना दिसले. स्पर्धक जय दुधाने बिग बॉसच्या घरात नेहमीच अरेरावी करत फिरताना दिसतो. त्याचा आक्रमकपणा बऱ्याच वेळा अनेक स्पर्धकांना आवडला नाहीये. आता सोनालीलाही त्याची भीती वाटू लागली आहे, असे एकंदरीतच तिच्या बोलण्यावरून वाटले.

सोनाली आणि मीनल या दोघींमध्ये या टास्क वरून चर्चा रंगलेली दिसून आली. बिग बॉसच्या घरात टास्क ऐन रंगात आला असताना या दोघी काही गंभीर विषयांवर बोलताना दिसल्या. हा गंभीर विषय अर्थातच जय दुधाने हा होता. याबद्दल सोनाली मीनलला म्हणाली, “हा म्हणाला होता की मला कॅप्टन नाही व्हायचं आहे. कुठेतरी त्यांना असं वाटत आहे, की मुलं-मुलांमध्ये जे व्हायचं ते होईल… पण कुठेतरी त्याने टेन्शन घेतलं आहे.” यावर मीनल म्हणाली, “प्रॉब्लेम कुठे होतो, जिथे जय, उत्कर्ष, विशाल आणि विकास एकत्र येतात. त्यावेळी ते म्हणणार की आपण एकत्र खेळूया. मात्र नंतर ते दोघे या दोघांवर गेम करतात.”

ती पुढे म्हणाली, “मी विशालला सांगितले, समजा तू, जय आणि उत्कर्ष तिघेच राहिलात, तर एका पोल वर तू आणि जय पडू नका. कारण मग जय उंची वापरून किंवा अजून काहीतरी वापरून स्ट्रॅटेजी करणार. मग साहजिकच उत्कर्ष त्याच्या पोल वर जाणार. त्यामुळे मग हे दोघंही नाही राहणार.” दरम्यान, सोनालीच्या बोलण्यात जयबद्दल भीती दिसून आली. जय ज्या पद्धतीने खेळतो, त्या पद्धतीबद्दल सोनालीला भीती वाटत असल्याचे जाणवले.

जयने आजपर्यंत बिग बॉसच्या घरात युक्तीपेक्षा शक्तीनेच बरीच कामं केली आहेत. त्यामुळे त्याला महेश मांजरेकरांचाही अनेकदा रोष ओढवून घ्यावा लागला आहे. तसेच इतर स्पर्धकही त्याच्या आक्रमकपणाला वचकून असतात, असे दिसते. सोनाली खरंच जयला घाबरते का, हे येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच.