‘जय मल्हार’ मधील म्हाळसा येणार नव्या रूपात भेटीला! ‘या’ अभिनेत्याची मिळणार साथ…

झी मराठी वाहिनी वरील ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेने लोकप्रियतेचे अनके विक्रम मोडीत काढले होते. या मालिकेतील सगळीच पात्रे प्रेक्षकांना भयंकर आवडून गेली होती. मालिकेतील कलाकार त्यामुळे खूप प्रसिद्ध झाले. मल्हारी मार्तंडांची माहीत नसलेली कथा लोकांना या निमित्ताने समजली. मालिकेतील खंडेराया, म्हाळसा आणि बानू यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना विशेष लोकप्रियता प्राप्त झाली. लोक मालिका संपल्यानंतरही या कलाकारांना त्याच नावाने ओळखू लागले.

‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा साकारली होती अभिनेत्री सुरभी हांडेने. तिचा विशेष मेकअप, बोलके डोळे आणि साजेसा अभिनय यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यानंतर तिने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतही काम केले होते. तिने ‘स्वामी’ या नाटकातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘आंबट गोड’ मालिकेच्या काही भागांमध्ये सुरभी झळकली होती.

‘अगंबाई अरेच्चा २’ (२०१५) या चित्रपटाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात तिची छोटी पण महत्त्वाची भूमिका होती. २०११ मध्ये तिला ‘स्टॅन्ड बाय’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. सुरभी सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असते. ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा नेहमी पारंपारिक वेशात दिसली आहे. मात्र खऱ्या आयुष्यात सुरभी खूपच मॉडर्न आणि ग्लॅ’म’रस आहे. ती आपल्या बो’ल्ड अँड ब्युटीफुल फोटोशूटचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. अलीकडेच तिने आपला गाणं गातानाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता.

आता सुरभी हांडे एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘अबोली’ या मालिकेतून ती प्रेक्षकांना भेटायला येत आहे. या मालिकेत एका सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलीच्या संघर्षाची कथा मांडण्यात आली आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता सचित पाटील देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक असलेला सचित बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तो या मालिकेत एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुरभी हांडे आणि सचित पाटील या फ्रेश जोडीचे स्वागत करण्यासाठी प्रेक्षकवर्ग सज्ज झाला आहे. या दोघांचेही चाहते त्यांना पुन्हा नव्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच ‘अबोली’ या नव्या मालिकेच्या कथानकाची देखील उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहेच. छोट्या पडद्यावर ही मालिका प्रसारीत झाल्यावर या मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे रंजक ठरेल.