‘लागिरं झालं जी’ मालिकेतील या अभिनेत्याचे निधन! झाला अपघाती मृत्यू…

झी मराठी वाहिनी वरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांवर गारूड केलं होतं. या मालिकेचे वेगळे कथानक प्रेक्षकांना आवडून गेले होते. मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा फार लोकप्रिय झाल्या होत्या. त्यामुळे मालिकेत काम करणारे कलाकारही प्रसिद्ध झाले होते. या मालिकेतील कलाकाराबद्दल मात्र एक दुःखद प्रसंग घडला आहे. मालिकेतील एका कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे.

‘लागिरं झालं जी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका…
‘लागिरं झालं जी’ मालिकेत नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या भूमिकांसोबतच प्रसिद्ध झालेली एक व्यक्तिरेखा म्हणजे नितीश म्हणजेच मालिकेतील आज्या बरोबरचे आर्मी ऑफिसर. ही आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती अभिनेते ज्ञानेश माने यांनी. या भूमिकेने त्यांना घराघरांत पोचवले. मात्र याच ज्ञानेश माने यांचा १४ जानेवारीला अपघात झाला आणि उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ज्ञानेश माने रोटी घाटातून पुण्याला येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यांना तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी या हरहुन्नरी कलाकाराने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्ञानेश माने हे मूळचे पुण्याच्या बारामती मधील झारगडवाडीचे. पेशाने ते डॉक्टर होते. मात्र त्यांची अभिनयाची आवड त्यांना मनोरंजन क्षेत्रात घेऊन आली. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोलापूर गॅंगवॉर, काळूबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, पळशीची पीटी, हंबरडा, यद्या यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत मनोरंजन विश्वात ज्ञानेश माने यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनय देखील, जनसेवा देखील…
अभिनय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपल्या डॉक्टरकीच्या माध्यमातून जनसेवा देखील सुरू ठेवली होती. अभिनय आणि डॉक्टरकी अशी तारेवरची कसरत करत असताना त्यांनी कधीच यात गडबड होऊ दिली नाही. दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अशा गुणी कलाकाराच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

ज्ञानेश माने यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश माने यांच्या आत्म्याला शांती लाभो, ही प्रार्थना!