कधी केलं वेटरचं काम, तर कधी धुतल्या गाड्या! स्वतःच्या हिमतीवर यशस्वी झालेल्या या अभिनेत्याची कहाणी…

तुम्ही चांगल्या घरातून आलात म्हणजे तुम्हाला स्ट्रगल करावा लागणार नाही, असे नाही. चित्रपटसृष्टीतही ही गोष्ट लागू पडते. तुमच्या घरचं कितीही चांगलं असलं तरी या क्षेत्रात तुम्ही केवळ तुमच्या मेहनतीवर आणि कौशल्यावरच पुढे जाऊ शकता. असाच स्वतःच्या बळावर पुढे आलेला अभिनेता आहे रणदीप हुडा. हायवे (२०१४), रंग रसिया (२०१४), सरबजीत (२०१६) सारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

रानदीपचा जन्म २० ऑगस्ट १९७६ रोजी एका मेडिकल सर्जनच्या घरी झाला. त्याचे वडील डॉ. रणबीर हुडा एक मेडिकल सर्जन होते, तर आई आशा देवी हुडा एक समाजसेविका होती. रणदीपच्या आईवडिलांना कामानिमित्त नेहमीच प्रवास करावा लागे, त्यामुळे रणदीप आपल्या आजीकडे वाढला. रणदीपची बहीण अंजली हुडा सांगवान देखील डॉक्टर असून ती अमेरिकेत असते. रणदीपचा लहान भाऊ संदीप हुडा सिंगापूर मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करतो.

हरियाणा मधील ‘मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स’ (MNSS) या बोर्डिंग स्कूल मधून रणदीपने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना त्याने पोहणे आणि अश्वारोहण स्पर्धांमध्ये भाग घेत राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे जिंकली. त्याच्या आईवडिलांना त्याने देखील मेडिकलला प्रवेश घ्यावा असे वाटत होते. मात्र पुढील शिक्षणासाठी १९९५ मध्ये तो ऑस्ट्रेलियामधील मेलबॉर्नला गेला. तेथे त्याने मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

त्याच्या तेथील वास्तव्यात त्याने अनेक कामे केली. त्याने त्यावेळी एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये काम केले. तसेच त्याने काम म्हणून गाड्या धुतल्या आहेत, तर कधी वेटर म्हणूनही काम केलं आहे. दोन वर्षं त्याने टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं आहे. २००० मध्ये भारतात परत आल्यानंतर त्याने एका एअरलाईनच्या मार्केटिंग विभागात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मॉडेलिंग तसेच नाटकांमध्ये नवशिक्या म्हणून काम करायला सुरुवात केली.

या दरम्यान त्याला दिग्दर्शिका मीरा नायरने पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. या ऑडिशनमध्ये पास झाल्यानंतर त्याला मीरा नायरच्या ‘मान्सून वेडींग’ (२००१) चित्रपटात एक छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली. मात्र आपल्या पुढील चित्रपटासाठी त्याला तब्बल चार वर्षं थांबावं लागलं. या दरम्यान तो जाहिरातींमध्ये काम करत होता. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ (२०१०) या चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळवून दिली.