लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत भाऊ सुद्धा आहेत एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक, जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल

मराठी चित्रपसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला असला तरी, प्रेक्षकांच्या मनावर तो आजही राज्य करत आहे. हा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका लक्ष्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातील स्ट्रगल नेमका कसा होता हे जाणून घेवूया.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई रजनी बेर्डे यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यावेळी कुठलेही दुःख असले तरी, ते चेहऱ्यावर कधीच दाखवायचे नाही. कायम हसरा चेहरा ठेवून लोकांना कसे आनंदित ठेवायचे. हा त्यांचा स्वभावगुण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आत्मसात केला होता.

लहानपणी चांगले कपडे घालता यावे. घरखर्चाला हातभात लागण्यासाठी दिवाळीत उटणे, फटाके ,उदबत्त्या विकल्या, लॉटरीची तिकिटं त्यांनी विकली. मात्र, दहा वर्षांनी त्याच तिकिटावर आपलं चित्र छापून येईल. हे कधीच त्यांना वाटले नव्हते. सुरुवातीचा काळ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी फार कठीण होता. त्यांनी स्ट्रगल करून अनेक ठिकाणी काम मिळतंय का या शोधत ते होते. मात्र, कुठेच काम मिळत नसल्याने हाती निराशाच आली.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत बंधू प्रसिद्ध अभिनेते , लेखक आणि दिग्दर्शक “पुरुषोत्तम बेर्डे ” हे अनेकांच्या ओळखीचे असतीलच. लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे हे दोघे बंधू मिळून कोकणस्थ वैश्य समाजात नाटकं बसवायचे. या दोघांनी मिळून “भाऊ बेर्डे” नावाने एक संस्था उभी केली होती. अनेक एकांकिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. यामध्ये ते दोघे नेहमी सहभागी होत असतं.

पुरुषोत्तम बेर्डे जे जे स्कुल ऑफ आर्टस् मध्ये गेले तिथून एकांकिका करत राहिले. लक्ष्मीकांत बेर्डे साहित्यसंघात नोकरी करून नाटकं करत होते. संगीतनाटक, बालनाट्य, तमाशा अशा बऱ्याच प्रोजेक्टमधून लक्ष्मीकांत बेर्डे काम करत होते. मात्र, म्हणावे तसे यश त्यांना मिळत नव्हते. स्ट्रगल चालू असतानाच पुढे बेर्डे बंधूनी “टूरटूर” हे नाटक करण्याचं ठरविले.

पुरुषोत्तम बेर्डे यांनी विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळींना गृहीत धरूनच नाटक लिहिले. नटाला खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा ते नाटक चालतं. मात्र, नाटकाच्या सुरुवातीच्या ४०व्या प्रयोगापर्यंत प्रेक्षकांकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटलं की, “बहुतेक मला आणखीन दहा – बारा वर्षे स्ट्रगल करावा लागतोय”. त्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांनी नाटकाची अनोख्या पद्धतीने जाहिरात करायचे ठरवले आणि तो प्रयोग यशस्वी झाला.

या नाटकाचे ५०० प्रयोग यशस्वीपणे पार पडले. हे १९८३ सालीच होत. याच साली ‘टूरटूर’ नाटकाच्या यशामुळे कॅमेरामन अरविंद लाड यांनी ‘हसली तर फसली’ चित्रपटात अभिनयाची मोठी संधी दिली. परंतू, काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण न झाल्याने तो प्रदर्शितही झाला नाही. टूरटूरच्या यशानंतर “शांतेचं कार्ट” हे नाटक प्रेक्षकांसमोर आले. हे नाटक देखील प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले होते.

दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्रात दूरवर पोहोचलं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो “हमाल दे धमाल” या चित्रपटातही त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रमुख नायकाची भूमिका दिली. शेम टू शेम, हाच सूनबाईचा भाऊ, भस्म, निशाणी डावा अंगठा, जाऊबाई जोरात, खंडोबाचं लगीन अशा अनेक चित्रपट नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले.