‘बिग बॉस मराठी ३’ अपडेट: तृप्ती देसाईंची बिग बॉसच्या घरातून एक्झिट! मानधनाचे पैसे वापरणार ‘या’ कारणासाठी…

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ विविध कारणांसाठी चर्चेत असतो. जशा या शो मध्ये घडणाऱ्या विविध घटना चर्चेत असतात, तसेच यातील कलाकारांचे मानधन हा देखील एक मोठा चर्चेचा विषय असतो. स्पर्धक जितके जास्त दिवस बिग बॉसच्या घरात राहतील, तितके जास्त मानधन त्यांच्या पदरात पडते. विजेत्याचे मानधन हे अर्थातच सर्वाधिक असते.

दर आठवड्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मध्ये ‘बिग बॉसची चावडी’ रंगते. शो चे होस्ट महेश मांजरेकर या सदरात स्पर्धकांची हजेरी घेताना दिसतात. जे स्पर्धक चांगले खेळतात त्यांचे कौतुक होते, मात्र जे स्पर्धक नियम पाळत नाहीत किंवा चुकीचे वागतात त्यांची या चावडीवर चांगलीच कानउघाडणी केली जाते. या चावडीचे अजून एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे एलिमिनेशन.

दर आठवड्याला एलिमिनेट झालेले स्पर्धक या चावडीवर जाहीर केले जातात. मग ते स्पर्धक या चावडीवर महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारत इतर स्पर्धकांना मोलाचा सल्ला देऊन जातात. यावेळी देखील स्पर्धक तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या चावडीवर आपले मन मोकळे केले. बिग बॉसच्या घरात जवळपास ५० दिवस राहिल्यानंतर तृप्ती देसाई एलिमिनेट झाल्या. प्रेक्षकांच्या व्होट्समुळे हे एलिमिनेशन झाल्याचे कळते.

समाजकारणात सक्रीय असलेल्या तृप्ती देसाई त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. समाजात स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई जेव्हा बिग बॉसच्या घरात गेल्या, तेव्हा त्यांचे नवीनच रूप पाहायला मिळाले. आपल्या मतांवर ठाम राहणाऱ्या, आग्रही स्वभावाच्या तृप्ती यांचे काही विशेष पैलू या शो मध्ये पाहायला मिळाले. आंदोलनात भांडणाऱ्या तृप्ती खऱ्या आयुष्यात फारच वेगळ्या आहेत. या शो मध्ये त्यांच्यातली काळजी घेणारी आई, जबाबदार मोठी बहीण, मैत्रीण असे अनेक पैलू पाहायला मिळाले.

एलिमिनेशन नंतर जेव्हा त्यांना विचारण्यात आले, की त्यांना मिळालेल्या मानधनाचे त्या काय करणार. लोकमत ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की त्या मानधनाचे पैसे आपल्या पुढच्या आंदोलनासाठी वापरणार आहेत. ‘बलात्कारमुक्त महाराष्ट्र’ या आंदोलनासाठी आणि उपक्रमासाठी त्या आपल्या मानधनाचे पैसे वापरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजकारणात सक्रीय असलेल्या तृप्ती देसाई जेव्हा बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवणार हे लोकांना समजले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. बिग बॉसच्या घरातील त्यांचा प्रवास चांगलाच गाजला. आता त्यांचे हे नवे आंदोलन किती गाजणार, यावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.