खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळणाऱ्या चेकचे काय होते पुढे? वाचून धक्का बसेल…

सध्या क्रिकेटचा माहौल सुरू आहे. टी-२० विश्वकपाने सध्या क्रीडा रसिकांमध्ये धूम निर्माण केली आहे. तसं तर क्रिकेट म्हटलं की क्रीडा रसिकांचा उत्साह सळसळून वाहात असताना दिसतो. वेगवेगळ्या सामन्यांच्या उत्सुकतेचं कारण वेगवेगळं असू शकतं. मात्र सामन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पुरस्कारांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असते.

कधी कधी केवळ सामनावीराला हा सन्मान मिळतो, तर कधी विविध प्रकारचे पुरस्कारही दिले जातात. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे बक्षिसाच्या ट्रॉफीसह मिळणारा चेक. ट्रॉफी बरोबरच एक मोठा चेक देखील दिला जातो. अर्थात हा चेक केवळ प्रतिकात्मक आणि दिखाव्यापुरता असतो, हे तर आता सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे. त्यामुळे केवळ प्रसारमाध्यमांसमोर दाखवण्यासाठी आणि फोटोसाठी पोज देण्यासाठी हा चेक वापरण्यात येतो.

मात्र एवढ्या मोठ्या चेकचे पुढे काय होते, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? हे मोठे चेक चक्क कचऱ्याच्या टोपलीत जाऊन पडतात. हे चेक विशेष करून प्लॅस्टिकचे बनवलेले असतात. असे प्लॅस्टिकचे चेक कचऱ्यात जाऊन पडले म्हणजे त्याने होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीत अजून भर पडते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा वन-डे सामना त्रिवेंद्रम येथे झाला होता. यावेळी रवींद्र जडेजाला सामनावीराचा मान देत १ लाखाचा धनादेश देण्यात आला होता.

हा चेक काही स्थानिक कर्मचाऱ्यांना कचरापेटीत आढळला. या घटनेचे फोटो प्रकृती या स्वयंसेवी संस्थेने सोशल मीडिया वर अपलोड केले होते. हे फोटो अपलोड करत ‘जर बीसीसीआय खेळाडूंना सामनावीराच्या किताबाची रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत असेल, तर या चेकची गरज आहे का?’ असा सवाल उपस्थित केला होता.

प्लॅस्टिक हा अविघटीत कचरा असल्याने त्याच्या अतिवापराने होणारे परिणाम ही सध्या जागतिक समस्या आहे. अनेक राज्यांमध्ये या दृष्टीने पावले उचलत प्लॅस्टिक वर बंदी आणली आहे. अशा वेळी बीसीसीआय ही प्रथा बंद करून काही वेगळा उपाय का शोधत नाही, असा सवाल प्रकृती या स्वयंसेवी संस्थेने विचारला आहे. या पोस्ट वर नेटीझन्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र नेटीझन्सनी देखील बीसीसीआयने यावर पर्यायी मार्ग शोधला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

या दिखाऊ चेक बद्दल तुमचं मत काय आहे मंडळी? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.